सोलापूरात दिग्गजांच्या जंगी सभा! राहुल आणि प्रियांका गांधी, शरद पवार, ज्योतिरादित्य येणार

सोलापूर – सोलापूर लोकसभा कॉंग्रेसचे उमेदवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी देशभरातील मान्यवर मंडळी सोलापुरात येणार आहेत. या जाहीर सभांसह कॉर्नर सभा आणि पदयात्रांद्वारे मान्यवर मंडळी सुशीलकुमार शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत .

आज तीन ठिकाणाहून प्रचाराचा शुभारंभ
सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी शुक्रवार 29 मार्च रोजी एकाच दिवशी एकूण तीन ठिकाणाहून प्रचाराचा नारळ फुटणार आहे. सकाळी 10 वाजता उत्तर सोलापूर तालुक्‍यातील मार्डी येथे राष्ट्रवादीचे नेते बळीराम काका साठे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते प्रचाराचा पहिला नारळ फुटेल. दुपारी दोन वाजता दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील वडापूर येथे माजी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके, तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे व सुरेश हासपुरे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करतील. त्यानंतर म्हणजेच दुपारी चार वाजता हत्तूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या हस्ते सोमेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. या तीनही ठिकाणी मान्यवरांच्या सभा होणार असल्याचेही निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार यांनी सांगितले.

#कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, ज्योतिरादित्य सिंधिया, चंद्राबाबू नायडू, अभिनेते चिरंजीवी यांच्यासह गुलाब नबी आझाद, एम. बी. पाटील, यशवंत गौडा-पाटील, विजयाशांती, नवाब मलिक, नसीम खान तसेच चंद्रकांत हंडोरे, मोहन बाबू, खासदार शेट्टी, उर्मिला मातोंडकर, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, हरिभाऊ राठोड आदी मंडळी सोलापुरात येऊन सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी प्रचार करणार आहेत.

त्यांच्या सभा पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तसेच सोलापुरातील पूर्व भागात आणि शहराच्या मध्यवर्ती भागात पार्क मैदानावर होणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)