अभिवादन: “समाजसुधारक’ वि. दा. सावरकर

विठ्ठल वळसेपाटील

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्‍त, साहित्यिक, कवी, नाटककार, हिंदुसंघटक अशा विविध पैलूंचा संगम म्हणजे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर होत. त्यांच्या अनेक पैलूंपैकी त्यांचे जातीनिर्मूलन कार्य उल्लेखनीय आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपासून सावरकरांना सरकारने उपेक्षित ठेवले परंतु त्यांचे विचार, साहित्य, त्यांचे कार्य पिढ्यान्‌पिढ्या मोलाचे ठरत आहे. अनेकांनी त्यांच्या विषयी अभद्र प्रचार व प्रसाराची मोहीम उभारली आहे; परंतु त्यांच्या विचारांना कोणताच गंज चढत नाही. जसजसा काळ बदलत चालला आहे तसा त्यांचा विचार अधिक प्रभावी ठरत आहे.

सावरकरांची 1924 साली दोन अटींवर तुरुंगातून मुक्‍तता करण्यात आली व रत्नागिरीत स्थानबद्ध केले. साडेतेरा वर्षे सावरकरांनी रत्नागिरीत काढली. इंग्रज आज ना उद्या भारत सोडून जातील; परंतु वर्षानुवर्षे येथे असलेला जातीयवाद, धर्मवाद, कर्मकांड यांनी हिंदू समाज आधुनिकीकरणापासून दुरावला आहे व भविष्यात स्वातंत्र्यानंतर मारक ठरणार असल्याचे ओळखले. त्यांनी स्थानबद्धतेच्या काळात समाजसुधारणेचे कार्य हाती घेतले. ह्या काळात त्यांनी अस्पृश्‍यता निवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदूधर्मात घेणे, भाषाशुद्घी आणि लिपीशुद्घी ह्या चळवळी केल्या. अस्पृश्‍य व उच्चवर्णीय ह्यांच्यात सामाजिक अभिसरण घडून यावे, यावर त्यांच्या अस्पृश्‍यता निवारण चळवळीचा विशेष भर होता. त्यासाठी स्पृश्‍यास्पृश्‍यांची सहभोजने, सर्व जातींतील महिलांचे हळदीकुंकवांचे समारंभ, शाळांमधून स्पृश्‍यास्पृश्‍य मुलांचे सहशिक्षण असे उपक्रम राबविले. हे सर्व करताना त्यांना कर्मठ सनातन्यांचा तीव्र विरोध सहन करावा लागला.

राष्ट्रहिताच्या दृष्टीनेसुद्धा सामाजिक सुधारणा झाल्यावाचून स्वराज्य मिळाले, तर ते तीन दिवससुद्धा टिकणार नाही, हे सावरकरांनी परखड मत मांडले. त्यामुळे हिंदू समाजात असलेला जातीभेद, वर्णभेद, विषमताच खऱ्या अर्थाने हिंदुस्थानाचे शत्रू आहेत. चार वर्णांच्या झालेल्या चार हजार जाती कशा नष्ट कराव्या लागतील. नुसती सुधारणा नको तर समाजक्रांती हा मार्ग महत्त्वाचा मानला. त्यांनी स्थानबद्धतेत असताना वेदोक्‍तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धीबंदी, रोटीबंदी व बेटीबंदी या सप्त स्वदेशी बेड्या तोडण्याचा कार्यक्रम राबवला. हे राबवत असताना अनेकजणांना तोंड द्यावे लागले. सावरकरांनी अस्पृश्‍यांना थेट गावात आणून भजने, व्याख्याने व हळदीकुंकू कार्यक्रम आखले. शाळांमधून शिक्षकांकडूनसुद्धा अस्पृश्‍यता पाळली जात होती. मुलांना बाहेर बसवले जात होते. 1925 ते 1928 सालापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशे शाळांपैकी 120 शाळांतून मुले सरमिसळ बसविली जाऊ लागली. सावरकरांनी शाळेत मुले संमिश्र बसवण्याचे आंदोलन उभारले व सनातनी, शिक्षक व स्कूल बोर्ड या सर्वांविरुद्धचा लढा यशस्वी केला. “अखिल हिंदू उपहारगृह’ माध्यमातून रोटीबंदी तोडली. पतित पावन मंदिर आवारात 1 मे 1933 साली उपहारगृह देणगी व उसने पैसे घेऊन उघडले. तेही एका दलित समाजातील तरुणाला दिले.

अंदमानात असतानासुद्धा सावरकरांनी सहभोजन करण्याची प्रत्यक्ष सुरुवात केली. इंग्रजांकडून कैद्यांना जेवण देताना हिंदू, मुस्लीम असा भेदाभेद करत असत. मात्र, सावरकरांनी कैद्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी स्वातंत्र्य महत्त्वाचे असल्याचे सांगून एकोपा घडवून आणला.

“बालविधवा दु:स्थितीकथन’ ही कविता व “जात्युच्छेदक निबंध’ लिहून सावरकरांनी चातुर्वर्ण्य व जातीपातीविषयीच्या तत्कालीन समजुतींवर विज्ञानाच्या दृष्टीने प्रहार केले. रत्नागिरीत असताना अस्पृश्‍यांना मंदिरात प्रवेशबंदी होती. सावरकरांनी भागोजीशेठ कीर या दानशूर व्यक्‍तीच्या माध्यमातून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर सन 1931 साली बांधले. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्‍यांना प्रवेश बंदीची भूमिका कर्मठ सनातन्यांनी घेतली. त्यावेळी सावरकरांनी “अखिल हिंदू गणपती’ स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि गणेशमूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली. धर्मांतरितांना पुन्हा हिंदूधर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्न हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी आर्थिक साहाय्यही दिले. आंतरजातीय विवाहांना प्राधान्य दिले. पाण्यासाठी अनेक विहिरी खुल्या करून दिल्या.
अरबी, फारसी आणि इंग्रजी भाषांचे आपल्या भाषांवर होणारे आक्रमण थांबवण्यासाठी भाषाशुद्घी, लिपीशुद्घी चळवळी उभारल्या.

आपल्या भाषांना समृद्धी प्राप्त करून देण्याचे काम त्यांनी केले. नागरी लिपीच्या संदर्भातही त्यांनी काही सुधारणा केल्या. अखेर 10 मे 1937 रोजी सावरकरांची बिनशर्त मुक्‍तता झाली. त्यानंतर ते हिंदू महासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही हाती घेतले. निःशस्त्र प्रतिकाराचे भागानगरचा व भागलपूरचा लढा दिला. भागानगरच्या लढ्याने निजामाच्या कायदेमंडळात हिंदूंना पूर्वी शून्य जागा होत्या, तेथे त्यांना 50 टक्‍के जागा निजामाला द्याव्या लागल्या. जिथे जिथे हिंदू समाजात अनिष्ट रूढीपरंपरा रुजल्या होत्या त्या सर्व घटकांवर प्रहार केले. सावरकरांनी अनेक समाजसुधारणेचे उपक्रम फळास नेले; परंतु स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्यांना आजही समाजात जातीय सलोखा निर्माण करता येत नाही. स्वा. सावरकरांना समजणे शक्‍य नाही व समजून घेतलेही नाही ही प्रगतशील भारताची मोठी शोकांतिका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)