चर्चेत: सोशल मीडिया आणि आजचे राजकारण

जगदीश देशमुख

राजकारणी नेत्यांना थेट लोकांपर्यंत अर्थात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे सोशल मीडिया. त्यामुळे सोशल मीडिया राजकारणाचा गाभा बनला आहे. राजकारणी सोशल मीडियाचा वापर निवडणूक कालावधीत चांगल्याप्रकारे करून घेत आहेत. एक प्रभावी माध्यम म्हणून नेते सध्या सोशल मीडियाकडे पाहू लागले आहेत.

“तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले’ हेच सोशल मीडियाच्या बाबतीत तो आला, त्याने सगळ्यांना आपली सवय लावली, आता सगळेजण त्याच्याशिवाय राहू शकत नाही, असे म्हणायची वेळ आली आहे. सोशल मीडियाचे फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटर, इन्स्टाग्राम आणि इतरही प्रकार आहेत. सोशल मीडियावर असणं आताच्या काळाची अनिवार्य गरज बनली आहे. तिथं नसणं काळाबरोबर नसल्याचे लक्षण मानले जाते. समाजात ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव असतो, त्या गोष्टी राजकारणाला अन्‌ राजकारण्यांना वर्ज्य करता येत नाहीत. त्यामुळे सोशल मीडिया उपयोगी असो वा उपद्रवी, त्याचा प्रभाव असल्याने राजकारण त्याभोवती फिरताना दिसत आहे आणि यापुढेही राहील. बदलत्या राजकारणाला समजून घेताना सोशल मीडियाला वगळून पुढे जाता येत नाही. त्यामुळे सोशल मीडिया आणि आजचे राजकारण समजून घेणे गरजेचे आहे.

सगळ्यांचा असा गैरसमज आहे की, मोदींनी (भारतीय जनता पार्टीने) सोशल मीडियाचा प्रभावी वापर करायला सुरुवात केली; पण तसे नाही. मोदी सत्तेवर येण्यापूर्वीच आपल्या देशात सोशल मीडिया लोकप्रिय झालेला आहे. सुरुवातीच्या काळात हे माध्यम उच्चशिक्षित मध्यमवर्गाकडे होते. अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात सर्वप्रथम ह्या माध्यमाचा वापर करण्यात आला. त्यामुळे भारतीय राजकारणात भ्रष्टाचार मुक्‍तीसाठी या माध्यमातून जेवढं प्रबोधन झालं, त्यापेक्षा अधिक उपयोग सत्ताधारी पक्षाच्या विरोधासाठी झालेला आहे. अगदी आताही हे माध्यम तेच काम नेटानं पार पाडत आहे.

हे माध्यम ट्रेंड निर्माण करण्यात कमालीचं यशस्वी झालेलं आहे. पण या माध्यमावर एकाच वेळी परस्परविरोधी ट्रेंड निर्माण होत असतात. त्यामुळे या माध्यमानं जन्माला घातलेले अन्‌ वाढवलेले पक्ष असोत वा नेते, त्यांची विश्‍वासार्हता ट्रेंडसारखीच अल्पजीवी असते.

राजकारण परिवर्तनशील असते, तसेच माध्यमेदेखील सतत बदलत असतात आणि ती बदलायलाच हवीत. फार पूर्वी आपल्याकडे वर्तमानपत्रे आणि रेडिओ ही संवादाची माध्यमे होती, त्यानंतर 2005 च्या आसपास न्यूज चॅनलने यामध्ये उडी घेतली आणि नंतर सोशल मीडियाने. अर्थात असे असले तरी आजही वर्तमानपत्राचे किंवा न्यूज चॅनलचे महत्त्व कमी झालेले नाही आणि पुढेही होणार नाही.

सोशल मीडिया जे घडतं, ते सांगण्यात प्रचंड यशस्वी झालेले आहे. त्याचबरोबर जे घडत नाही तेदेखील तितक्‍याच, किंबहुना अधिक गतीने सांगण्यात या माध्यमानं “यश’ संपादन केलेले आहे. घडणाऱ्या गोष्टी अन्‌ न घडणाऱ्या गोष्टी यांना राजकारणात महत्त्व असतं. त्यातच राजकारणात वेळही खूप महत्त्वाची असते. कमीत कमी वेळात सगळ्यांच्या आधी लोकांपर्यंत आपण आपले विचार पोहचले पाहिजेत हा सुप्त अहंकार या माध्यमातून जोपासला जातो. न घडलेल्या गोष्टी आणि अधिक गतीने सोशल मीडिया या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींना “न्याय’ देण्यास तत्पर आहे. जे घडत नाही ते सोशल मीडिया मोठ्या शिताफीनं पार पाडत असल्यानं हे आजच्या धोरणात्मक उपद्रवी राजकारणातील महत्त्वाचे माध्यम झाले आहे.

संकुचित राजकारणाला जे हवे आहे, ते सोशल मीडिया देत असल्याने या माध्यमाला राजकारणात अधिक महत्त्व आलेले आहे. सोशल मीडियाचे राजकारणातील महत्त्व वाढण्याचे आणखी एक कारण आहे की, हे माध्यम संपर्कात राहण्यासाठी फारच सोपे आहे. राजकीय नेत्यांना आपले समर्थक आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने संपर्कात ठेवावे लागतात किंवा त्यांच्या संपर्कात राहावे लागते. गावच्या राजकारणापासून देशाच्या राजकारणापर्यंत या माध्यमाचा प्रभाव आहे. कारण सारं गाव या माध्यमावर येऊन बसलं आहे. त्यामुळे एखादा विषय किंवा एखादा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही. अर्थात, असे असले तरी सोशल मीडियाचे काही नुकसानही आहेत.

1) नियंत्रणाअभावी हे माध्यम कुणाचंच नाही. त्यामुळेच या माध्यमाची विश्‍वासार्हता अडगळीत सापडलेली आहे.
2) माणसांमध्ये काहीशी आपुलकी हे माध्यम वाढवत आहे. पण त्यात आभासीपणा जास्त आहे.
3) व्यक्‍त होण्याचे माध्यम नव्हते तेव्हा माणसे संयमी होती. आता व्यक्‍त होण्याचे माध्यम मिळाल्याने माणसे काहीशी उतावीळ झालेली आहेत.
4) हे माध्यम दुधारी तलवारीसारखे आहे. त्याचा जसा वापर करू तसा परिणाम होत असतो. त्याचा विधायक वापर होतो की विघातक यावर काहीही आणि कुणाचेच नियंत्रण नसल्याने हे समाजासाठी, राजकारणासाठी घातक आहे.
5) हे माध्यम गतिशील असल्याने त्याची परिणामकारकता तितकीच गतिशील आहे. ज्या गतीने ते एखाद्याला उंचीवर घेऊन जाते, त्याच गतीने खाली खेचते. त्यामुळे ते आज ज्याच्या फायद्याचे असते, उद्या त्याच्या तोट्याचेही ठरू शकते.

असं सगळं असले तरी “तू सोशल मीडियावर नाहीस’, असं काहीसे उपहासात्मक बोलले जाते. आपण सोशल मीडियावर नाही म्हणजे आपण काही पाप करतोय का? अशी भावना मनामध्ये येते. त्यामुळे आताच्या काळात सोशल मीडियावर असणे ही काळाची गरज बनली आहे. म्हणजे एकवेळचे जेवण नसले तरी चालेल पण नेट पाहिजे असे किती लोकांना वाटते असा प्रश्‍न घेऊन सर्व्हे केला तर 95 टक्‍के लोक म्हणतील जेवण नको पण नेट द्या. अर्थात फक्‍त तरुणच नाही तर सगळ्याच वयोगटातील माणसे सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. अर्थात, तुम्ही सोशल मीडियावर नसाल तर तुमचा वर्तमानाशी संबंध तुटेल, तुम्ही वर्तमानकाळात जगत नाहीत असा त्याचा अर्थ होतो.

आताच्या राजकारणावर इतिहासाचे ओझे नाही, पण वर्तमानाचे मात्र मोठे दडपण आहे. तुम्हाला वर्तमानकाळाशी जुळवून राहावेच लागते आणि ते शक्‍य आहे सोशल मीडियामुळे. म्हणून तर आज बहुतेक जग सोशल मीडियाशी जोडलेले आहेत आणि आपले मतदार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी राजकारणी असायलाच पाहिजेत. म्हणून सोशल मीडिया हा आजच्या काळातील राजकारणाचा गाभा बनला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)