स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा : पांडे डिझाईन्स, कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघ बाद फेरीत दाखल

तेरावी पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे – गटसाखळी फेरीत पांडे डिझाईन्स, पंडित जावडेकर असोसिएट्‌स, कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून येथे होत असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्डस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत इ गटात पांडे डिझाईन्स संघाने क्‍यू मास्टर्स अ संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून बाद फेरीत धडक मारली. सामन्यात पांडे डिझाईन्सच्या दिग्विजय केडियन याने क्‍यू मास्टर्स अ संघाच्या सतीश कराडचा 38-05, 66-20, 41-30 असा पराभव करून संघाचे खाते उघडले.

दुसऱ्या सामन्यात पांडे डिझाईन्सच्या ब्रिजेश दमानीने आकाश पाडाळीकरचा 85(77)-00, 76-17, 52-11 असा पराभव करून विजयी आघाडी मिळऊन दिली. यात विशेष म्हणजे पांडे डिझाईन्सच्या ब्रिजेश दमानीने आपल्या खेळीत पहिल्या फ्रेममध्ये सिक्‍स रेड स्नूकरमधील 77 गुणांचा विक्रमी ब्रेक नोंदविला. सिक्‍स रेड स्नूकरमध्ये सर्वाधिक 75 गुणांचा ब्रेक होऊ शकतो, पण ब्रिजेशला सामन्यात फ्री बॉल मिळाल्यामुळे त्याने या संधीचा फायदा घेत स्पर्धेतील सर्वाधिक 77 गुणांचा ब्रेक नोंदवून एक नवा विक्रम आपल्या नावावर रचला. तिसऱ्या लढतीत पांडे डिझाईन्सच्या अनुज उप्पल याने सिद्धार्थ टेंबेचा 73(73)-00, 86(53)-12, 67-00) असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला.

ग गटात अमनोरा द फर्न क्‍लब संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत पूना क्‍लब ब व 147 पूल अँड स्नूकर या संघांचा 3-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करून बाद फेरी गाठली. ब गटात फैजल खान, लक्ष्मण रावत आणि लकी वटनानी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघाने डेक्कन रुकीजचा 3-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. ड गटात पहिल्या सामन्यात पंडित जावडेकर असोसिएट्‌स संघाने ठाणे टर्मिनेटर्सचा 3-0 असा तर, दुसऱ्या सामन्यात एसआरके मास्टर्स संघाचा 3-0 असा पराभव करून सलग तिसरा विजय नोंदविला.

याचबरोबर अ गटातून पीवायसी वॉरियर्स, खार जिमखाना, फायर बॉल्स, क गटातून कॉर्नर पॉकेट क्‍युइस्ट, ई गटातून कॉर्नर पॉकेट वॉरियर्स,केएसबीए, ऑटो पॉट्‌स, ह गटातून वाडेश्वर विझार्डस, कॉर्नर पॉकेट शूटर्स, एमपी स्ट्रायकर्स या संघानी बाद फेरीत प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)