स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा : वाडेश्वर विझार्डस संघाचा बाद फेरीत प्रवेश

तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत ह गटात वाडेश्वर विझार्डस संघाने सलग तिसरा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्डस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ह गटात वाडेश्वर विझार्डस संघाने रॅक एम अप संघाचा 3-0असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. पहिल्या सामन्यात वाडेश्वर विझार्डसच्या आशुतोष पाधीने रॅक एम अपच्या मयंक भावसारचा 01-38, 67-05, 44-37, 57-44 असा पराभव करून संघाचे खाते उघडले.

दुसऱ्या सामन्यात ह्रितिक जैन याने सुमित सादुलकरचा 30-32, 74-42, 51-04, 61-39 असा पराभव करून वाडेश्वर विझार्डसला 2-0अशी आघाडी मिळवून दिली.तिसऱ्या लढतीत वाडेश्वर विझार्डसच्या हिमांशू जैन याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत विशाल वायावर 19-47, 50-63, 42-37, 115(107)-15, 38-36 असा सनसनाटी विजय मिळवला. यामध्ये हिमांशू जैन याने चौथ्या फ्रेममध्ये 107 गुणांचा ब्रेक नोंदवून संघाचा विजय सुकर केला. अन्य लढतीत वाडेश्वर विझार्डस संघाने अनुक्रमे एमपी स्ट्रायकर्स व कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाचा 2-1अशा सारख्याच फरकाने पराभव करून आपले बाद फेरीतील स्थान निश्‍चित केले.

ब गटात अरुण बर्वे, रोहित नारगोलकर, सलील देशपांडे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी जायंट्‌स संघाने डेक्कन रुकीज संघावर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला. ग गटात द बॉल हॉग्ज संघाने147 पूल अँड स्नूकर संघाचा 3-0 असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून अशोक शांडिल्या, लौकिक पठारे, आदित्य अगरवाल यांनी सुरेख कामगिरी बजावली.

तर, दुसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने बीएसएसए मास्टर्स संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. तिसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने पूना क्‍लब ब संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. इ गटात केएसबीए संघाने डेक्कन रायनोजचा 2-1असा तर दुसऱ्या सामन्यात ऑटो पॉट्‌स संघाचा 2-1 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)