उंब्रज – राष्ट्रीय महामार्गालगत इंदोली गावच्या हद्दीत इंदोली फाटा येथे पेट्रोल पंपावर ट्रक लावून ट्रकमध्ये झोपलेल्या दोघा जणांचे खिशे कापून रोख रक्कम व मोबाईल हॅंडसेट चोरुन नेल्याची घटना सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तक्रार ट्रकचालक विजय सयाजी देवकांत रा. रामापूर, ता. पाटण यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली आहे. रविवारी फिर्यादी व त्यांचे मालक गुरुप्रसाद आनंदराव जाधव रा. देसाई गल्ली, पाटण हे औरंगाबादमध्ये ट्रकमध्ये लोखंडाचा चुरा भरून ओगलेवाडीतील एका कारखान्याकडे जात होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ट्रक इंदोली गावच्या हद्दीत आल्यानंतर त्यांनी सदरचा ट्रक रस्त्याकडेला असणाऱ्या सोहम पेट्रोल पंपावर घेतला व ट्रक तेथे उभा करून ट्रकमध्येच झोपी गेले.
विजय देवकांत व ट्रक मालक गुरुप्रसाद जाधव यांचे खिशे कापून खिशातील पाचशे रुपये किंमतीचा मोबाईल व दोन हजार रुपये रोकड तसेच गुरुप्रसाद जाधव यांच्या खिशातील एमआय कंपनीचा दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला आहे. झोपेतून जाग आल्यानंतर गुरुप्रसाद जाधव यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली असता शेजारील झाडीत लायसन व कागदपत्रे मिळून आली. मात्र रोकड व मोबाईल मिळून आले नाहीत. घडल्या प्रकाराबाबत विजय देवकांत यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास उंब्रज पोलीस करत आहेत.