मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सन याने चेंडू छेडछाड प्रकरणी बंदी घातलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट यांच्यावरील बंदी कायम राहावी, असे मत व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियातील एका प्रसिद्ध क्रीडा पत्रकाराने जॉन्सनच्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबत त्याला विचारले होते. त्यावर त्याने आपले मत दिले आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात चेंडू छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या या तीन खेळाडूंवर बंदी आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचा सध्याचा खराब फॉर्म पाहता भारताविरुद्धच्या मालिकेत त्यांच्या संघाची आणखी दुरावस्था होऊ नये म्हणून ऑस्ट्रेलियाचे अनेक माजी खेळाडू स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावरील बंदी उठवली जावी आणि त्यांना संघात स्थान मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत. त्याबाबत एका पत्रकाराने जॉन्सनचे मत जाणून घेण्यासाठी त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावर त्याला विचारणा केली असता जॉन्सन म्हणाला, या खेळाडूंना त्यांची शिक्षा काबुल आहे. त्यांनी शिक्षा कमी व्हावी म्हणून ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाकडे कोणतीही अपील केलेली नाही. त्यामुळे त्याच्यावरील बंदी कायम राहावी, असे त्याने यावेळी सांगितले.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी देखील आपले मत या विषयावर व्यक्त केले असून त्याच्यावरील बंदी कायम राहावी असे त्यांचे मत आहे. ते म्हणाले, मला नाही वाटत की त्याच्यावरील बंदी कमी करायला हवी आहे. कारण त्यांनी सामना जिंकण्यासाठी खूप खालच्या पातळी वर गेले होते. याचा काय परिणाम होईल याची त्यांना फिकीर नव्हती. जर त्यांच्यावरील बंदी कमी केली तर पुन्हा असे कृत्य करण्यास प्रवूत्त होतील. त्यामुळे त्याच्यावरील बंदी कायम राहावी, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा