दोन कोटी 36 लाखांचा खर्च : पोलीस आणि पालिकेसाठी उपयुक्त
पिंपरी – निगडी येथील अस्तित्त्व मॉलमध्ये आता स्मार्ट सिटी कार्यालयातंर्गत कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर (नियंत्रण केंद्र) सुरू केले जाणार आहे. त्यासाठी 2 कोटी 36 लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे. महापालिका भवनात सध्या स्मार्ट सिटी कार्यालय कार्यरत आहे. नव्याने होणाऱ्या कमांड आणि कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून महापालिकेला शहरात घडणाऱ्या विविध घटनांवर लक्ष ठेवता येणार आहे.
महापालिकेची कार्यालये, रूग्णालय व अन्य इमारती या केंद्राला जोडलेल्या राहतील. संबंधित केंद्राला शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हिज्युअल मॅसेज डिसप्ले बोर्ड जोडले जातील. महापालिका आणि पोलीस प्रशासन अशा दोघांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. केंद्रात मिळणारी माहिती, व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना वाहतूक नियंत्रण, सिग्नल यंत्रणा यावर लक्ष ठेवता येणार आहे. आरोपींचा छडा लावण्यासाठी देखील या यंत्रणेचा उपयोग होईल. तर, महापालिका प्रशासनाला सर्व कार्यालये, रूग्णालये व अन्य इमारतींची नियमित देखरेख करणे शक्य होणार आहे.
महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निविदेमध्ये प्रामुख्याने स्थापत्य आणि विद्युतविषयक कामांचा समावेश आहे. 28 जूनला निविदा स्वीकृती होणार आहे. त्यानंतर कामाचे आदेश देऊन पुढील तीन महिन्यांमध्ये काम पूर्ण केले जाईल. केंद्रासाठी आवश्यक फर्निचरची सोय आणि अन्य बाबींची पूर्तता केली जाणार आहे.
– लक्ष्मीकांत कोल्हे, प्रवक्ता, स्मार्ट सिटी.