भेट छोटीशी

आपल्याला एखादी छोटीशी भेट मिळते. आपल्याला ती आवडते सुद्धा. छोटीशीच गोष्ट असते. पण तितक्‍यात असं काहीतरी होतं की ती वस्तू आपण समोरच्या तिसऱ्याच व्यक्तीला भेट म्हणून देतो. त्यात पहिली भेट देणाऱ्या व्यक्तीचा अपमान नसतो करायचा. ती गोष्ट बहूमूल्य असतेच आपल्यासाठी. पण समोरची घटना देखील आपल्याला आपल्याकडे त्याक्षणी जे असेल ते तरी किमान द्यावे दुसऱ्याला, म्हणून उद्युक्त करत असते.

मी एका ऑफिसातल्या मॅडमला एक ओरिगामी बुकमार्क स्वतः बनवून भेट दिला. त्यांना तो खूपच आवडला. त्यांनी तो त्यांच्या डायरीत जपून ठेवला. मग मी गेले. जरा वेळाने एक नवीन मुलगी तिथे आली. ती जॉईन होणार होती. तिच्या सात-आठ वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती ती. ह्या मॅडमकडे त्याला देण्यासाठी चॉकलेट वगैरे काहीच नव्हते. त्यांना नुकताच भेट मिळलेला ओरिगामी हार्ट बुकमार्क त्यांनी त्याला भेट म्हणून दिला. मुलगा आणि आई बाहेर पडले. ते दारात जात नाहीत, तर मुलगा आईला परत ओढून मागे घेऊन आला त्या मॅडमकडे. त्यांच्याकडे हाताने बुकमार्क देत त्याच्या आईला तो म्हणतो, “मी एका मुलीचे हार्ट घेऊन जाऊ शकत नाही असे. तिला हार्ट नको का?”. त्या मॅडम आणि त्याची आई ह्या प्रश्‍नावर गोड हसल्या. मॅडमने मुलाला सांगितले, “तुलाही हार्ट आहे. मुलींनाच हार्ट असते असे नाही. मुलांना पण असते. तुझ्या हार्टमध्ये मला पण जागा दिलीस की तू आता! आता तुझेही भेट माझ्यापाशी आहे बघ!”. तेंव्हा कुठे त्या मुलाने तो हार्ट बुकमार्क स्वीकारला.

ही गोष्ट त्या मॅडमने मला आवर्जून बोलवून घेऊन सांगितली. त्यांना त्यांच्यासाठीचा अशी नवा एक हार्ट बुकमार्क दिला. सोबत एक कागदी मासासुद्धा बुकमार्कसारखा बनवून दिला. लहानसहान गोष्टींत किती मोठा आनंद असतो!

– प्राची पाठक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)