तपनेश्‍वर रस्त्यावरील गटारीचा पुन्हा खचला स्लॅब

पालकमंत्र्यांच्या ड्रिम प्रोजेक्‍टला ठेकेदाराचा सुरुंग : मुदत संपत येऊनही काम अपूर्ण 

जामखेड  – खर्डा चौक ते अमरधाम या साडेचार कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या बाजूने तयार करण्यात आलेल्या भूमिगत गटाराचे काम निकृष्ट झाल्याचे उघड झाले आहे. पहिल्याच पावसात या भूमिगत गटाराचा स्लॅब खचला आहे. मात्र निकृष्ट काम होऊनही पालकमंत्री राम शिंदे यांनी अद्यापपर्यंत ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. ठेकेदाराला 12 महिन्यांची मुदत देऊन अद्याप अर्धेही काम झाले नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

शहरातील खर्डा चौक ते अमरधाम हा दीड किलोमीटरचा रस्ता खड्ड्यांमुळे व उघड्यावरील गटारीमुळे नागरिकांसाठी प्रवासासाठी खडतर झाला होता. या रस्त्याच्या कामासाठी अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आले होती. जलसंधारण तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी शहरातील हा टॉपचा रस्ता दुपदरी होईल यादृष्टीने 950 मीटर रस्त्यासाठी 4 कोटी 27 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजूर करवून आणला. त्यात सिमेंट रस्ता व दोन्ही बाजूंनी भूमिगत गटार, यांचा समावेश आहे. नगरपरिषदेमार्फत तपनेश्वर रस्त्याचे काम सुरू असून, सादर कामाचा कार्यारंभ आदेश 11 जुलै 2018 रोजी दिला असून, कामाची मुदत 12 महिने आहे. मात्र 11 जुलै 2019 रोजी ही मुदत संपत असून, अद्याप रस्त्याचे अर्धेही काम झाले नाही.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला असून, नागरिकांना चालताही येत नाही. याबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटेनेही या रस्त्याच्या कामासाठी दोन दिवसांपूर्वीच आंदोलन केले होते. मागील सहा महिन्यांपासून भूमिगत गटारीचे काम चालू आहे. रस्त्याच्या बरोबरीने घेतलेल्या या भूमिगत गटारावर कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे.

मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने दुचाकी अथवा चार चाकी वाहन त्यावरून गेली, तरी ती खचत आहेत. असे असतानाही ठेकेदार व नगरपरिषदेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या मृगाच्या पहिल्याच पावसात गटाराचे कॉंक्रिटीकरण ठिकठिकाणी उखडले आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)