स्लिवलेस घाला पण…

स्लिवलेस ब्लाऊज किंवा स्लिवलेस टॉप ही एक सौंदर्य खुलवणारी फॅशन आहे असं म्हटलं तरी चालेल. पण हा प्रकार काहींनाच सूट होतो. दंड अति जाड असतील ही फॅशन चांगली दिसत नाही. स्लिवलेस ब्लाऊज घाला, पण त्यापूर्वी आवश्‍यक ती खबरदारी घ्या. सर्वप्रथम स्वत:ची शारीरिक ठेवण व स्वत:च्या देहयष्टीचं व्यवस्थित निरीक्षण करा. जर तुम्ही उंच व सडपातळ असाल तर स्लीवलेस ब्लाऊज घालू नका. कारण अशा ब्लाऊजमध्ये तुमच्या बाहूंचं खरं स्वरूप दिसून येतं आणि तुम्ही त्यामुळे आणखीन बारीक दिसता.

आता तुम्ही मान, पाठीचा भाग, छाती आणि हातांचे कोपरे यांचं नीट निरीक्षण करा. जर तुमचा गळा, मान आणि पाठीचा रंग झाकलेल्या भागांपेक्षा अधिक गडद दिसत असेल तर स्लीवलेस ब्लाऊज न वापरता प्रथम त्या भागांची व्यवस्थित सफाई करा.

स्लिवलेस ब्लाऊज घालण्यापूर्वी रोज नियमितपणे बाह्यांसह दोन्ही हातांची नियमितपणे स्वच्छता करा. बाह्या व हातांवरील त्वचेचा रंग सारखा राहण्यासाठी रोज बेसन, लिंबू आणि त्यात चिमूटभर हळद घालून तयार झालेला लेप बाह्यांसह हातांवर लावा आणि मग चांगल्या तऱ्हेने स्क्रब करा.

नंतर चांगल्या दर्जाचं मॉईश्‍चरायझर घेऊन त्याने चांगलं मसाज करा. रोज स्नान करण्यापूर्वी आंबट दही व बेसन यांचं मिश्रण घेऊन ते खांदा व पाठीवरील गडद भागावर लावा व नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. नैसर्गिक ब्लीच म्हणून दह्याचा वापर केला जातो. दह्याच्या नियमित वापरामुळे त्वचेचा सावळेपणा कमी होईल.

तुम्ही गृहिणी असा वा नोकरी करणारी स्त्री, रोज स्वच्छ स्नान करा. योग्य वेळ देत स्नान केल्यास तुम्हाला दिवसभर प्रसन्न तर वाटेलच, शिवाय त्वचेचा रंगदेखील चांगला राहील. स्नान करते वेळी कंबर, मान व पाठीच्या भागाची स्वच्छता ठेवा. साबण लावल्यानंतर दोन ते तीन मिनिटांनंतर ती नीट घासून घ्या. यामुळे या ठिकाणी जमा झालेला मळ, घाम, दुर्गंधी व त्वचेच्या मृत पेशीदेखील निघून जातील. स्नान केल्यानंतर संपूर्ण शरीरावर बॉडी लोशनने व्यवस्थित मालीश करा.

नुसतंच मॉइश्‍चरायझर लावून तसंच ठेवू नका. तर ते त्वचेमध्ये पूर्णपणे मुरेपर्यंत हळूहळू मालीश करा. यामुळे त्वचेवरील छिद्रं नरम पडून त्वचा कोमल व स्वच्छ दिसू लागेल.हातांच्या कोपरांच्या स्वच्छतेशिवाय हातांची स्वच्छता पूर्ण होत नाही.
हातांच्या कोपरांवरील त्वचा काळी, जाड व खरखरीत झाली असेल तर कोमट पाणी घेऊन थोडासा साबण हातांच्या कोपरांवर लावा आणि मग पाच मिनिटं हा साबण तसाच राहू द्या. मधून मधून साबणाचं पाणी लावून हा भाग ओला ठेवा. त्यानंतर आंघोळीसाठी तुम्ही वापरत असलेल्या मुलायम ब्रशच्या सहाय्याने किंवा लूफाने तेथील त्वचा चांगली घासून घ्या. मग स्वच्छ पाण्याने हा भाग धुऊन घ्या व टॉवेलने नीट पुसा. नंतर दहा बदाम, एक अंडं व एका लिंबाचा रस मिळून लेप तयार करा व तो सुमारे 15 ते 20 मिनिटांपर्यंत हातांच्या कोपऱ्यांना लावून ठेवा. मग थोडंसं कोमट पाणी घेऊन हळूहळू स्वच्छ धुऊन काढा.

यामुळे हातांची कोपरं व बाह्या येथील त्वचा हळूहळू उजळ होईल. असे सुंदर हात असतील हरकत नाही स्लिवलेस वापरायला.

– सुजाता टिकेकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)