पुलवामात सहा दहशतवादी ठार

श्रीनगर: दक्षिण काश्‍मीर मधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले आहेत. या जिल्ह्यातील आरामपोरा गावात आज सकाळी ही चकमक झाली. तेथे दहशतवाद्यांचा वावर असल्याची खबर सुरक्षा दलाला आधीच लागली होती त्यानुसार त्यांनी तेथे पुर्ण नाकाबंदी करून ही कारवाई केली.

काश्‍मीर खोऱ्यात गुप्तचर यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत करण्यात आली असून त्यांच्या यंत्रणेमार्फत मिळालेल्या माहितीवर सुरक्षा दलांकडून तातडीने कार्यवाही केली जात असल्याने दहशतवाद्यांना चाप लावण्यास सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आलिकडच्या काळात मिळू लागले आहे. दरम्यान आज ठार झालेल्या सहा दहशतवाद्यांची ओळख पटू शकलेली नाही. ते काम सुरू आहे. या चकमकीत गावकरी किंवा तेथील मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही असे स्पष्टीकरणही सुरक्षा दलांनी दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान सायंकाळी आलेल्या वृत्तानुसार ठार झालेले सर्व दहशतवादी झाकीर मुसा याच्या संघटनेशी संबंधीत होते. झाकीर मुसा हा अलकायदाचा हस्तक असल्याचे मानले जात आहे. झाकीर मुसाची अन्सार गझवतुल हिंद नावाची स्वतंत्र दहशतवादी संघटना आहे. ठार झालेल्या सर्वांची नावेही तपास अधिकाऱ्यांना समजली असून त्यांची ओळखही पटवण्यात आली आहे. ठार झालेले सर्व दहशतवादी त्राल भागातल्या दडसरा येथील रहिवासी आहेत. यातील रसिक नावाचा दहशतवादी पाच वर्षांपासून तर अखून नावाचा दहशतवादी गेल्या तीन वर्षांपासून घातपाती कारवायांमध्ये गुंतलेले असल्याचे त्यांच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

सोफी आणि रमझान नावाच्या ठार झालेल्या दहशतवाद्यांवरही घातपाती कारवायांशी संबंधीत गुन्हे दाखल आहेत. या दहशतवाद्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे मृतदेह सायंकाळी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ही चकमक ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी स्फोटके असण्याची शक्‍यता असल्याने त्या भागात जाऊ नये असे आवाहन सुरक्षा दलांनी नागरीकांना केले आहे. तो भाग स्फोटके रहित करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)