कराड तालुक्यात सहा चेक पोस्ट

रेकॉर्डवरील 876 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कराड – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यात सहा ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले असून चेक पोस्टवर सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली. दरम्यान, रेकॉर्डवरील 876 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून गंभीर गुन्ह्यांतील सराईतांचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून त्यावरही अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यानुषंगाने तालुक्‍यात शेणोली चौक, मालखेड फाटा, उंडाळे बसस्थानक, शामगाव फाटा, सुर्ली घाट, तासवडे टोलनाका या महत्त्वाच्या ठिकाणांवर चेक पोस्ट करण्यात आले आहेत. तसेच त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहनांमधून अवैध दारू, अमली पदार्थ, रोख रक्‍कम नेली जात आहे का? याची तपासणी चेक पोस्टवर केली जात आहे.

खंडणी, फसवणूक, खून, मारामारी, अवैध व्यावसायिक, दहशत माजवणारे, महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या रेकॉर्डवरील तब्बल 876 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर स्वतंत्र पथकामार्फत नजर ठेवली जात असून यातील काहींवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. तडीपारीसंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही पुर्ण झाली असून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये फरारी असणाऱ्या संशयितांच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आले असून या पथकामार्फत फरारी संशयीतांचा शोध घेतला जात असल्याचेही पोलीस उपअधीक्षक ढवळे यांनी सांगितले.

सोशल मीडियावर स्वतंत्र पथकाची नजर…
निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियावरून अफवा पसरविण्याचे प्रकार घडतात. तसेच त्यातून सामाजिक, राजकीय तेढ निर्माण होईल, असा प्रसंग उद्‌भवू शकतो. त्यामुळे अशा पोस्टवर नजर ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्वतंत्र पथक तयार केले असून त्या पथकाची सोशल मीडियावर नजर राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)