शिवतारेंची दुतोंडी भूमिका त्यांचेच दात घशात घालणारी

अगतिकता लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न; उदयनराजेंचा पालकमंत्र्यांवर पलटवार

दुतोंडीपणाचे घटनाबाह्य वक्‍तव्य नैराश्‍येमधून

लोकप्रतिनिधी म्हणून जनेतेने दिलेला अधिकार फार मोठा आहे. जनता जनार्दनाने सलग तिसऱ्या वेळी दिलेला आशीर्वाद मोलाचा आहे. जनतेच्या हिताच्या बाबींसाठी आढावा घेतला तर चुकले कुठे ? आम्हीच काय पण जनतेच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला अशावेळी कोणतेहा अध्यादेश किंवा कोणतेही परिपत्रक अटकाव आणू शकत नाही. पालकमंत्र्यांची विवशता आणि त्यांच्यापुढील असलेल्या विवंचने मधूनच त्यांनी दुतोंडी पणाचे घटनाबाह्य वक्‍तव्य नैराश्‍येमधून केले असावे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमूद केले आहे.

सातारा –  विरोधी सदस्यांनी मागणी केली तर विधिमंडळाचे अधिवेशन देखील बोलावणे कोणत्याही सरकारला भाग पडते, तर टंचाई आणि दुष्काळी पार्श्‍वभूमीवर टंचाई बैठक बोलावण्याची मागणी करणे आणि तशी बैठक जिल्हाधिकारी यांनी बोलावणे कायदेशीरच आहे, अशी बैठक बोलावण्याचा आम्हाला म्हणजेच उदयनराजेंना अधिकार नाही आणि खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांना मात्र आहे ही पालकमंत्र्यांची दुतोंडी भूमिका त्यांचेच दात घशात घालणारी आहे.

गेली साडेचार वर्षे फक्‍त बैठकीपुरतेच येण्याचे कष्ट घेणाऱ्या पालकमंत्री महोदयांनी कोणत्या तरी आदेशाच्या आधारावर लोकशाही विरोधी, घटनाबाह्य वक्‍तव्य करून, आपली विवशता आणि अगतिकता लपवण्याचा प्रयत्न करू नये अशा खरमरीत शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांवर पलटवार केला. उदयनराजेंना टंचाईची बैठक बोलावण्याचा अधिकार नाही अशा तऱ्हेचे वक्‍तव्य सातारचे पालकमंत्री यांनी केल्याच्या पार्श्‍वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, ज्यांचा अजून खासदार म्हणून शपथविधी होऊ शकलेला नाही त्या नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी मात्र नुकत्याच बोलावलेल्या टंचाईच्या बैठकीचे पालकमंत्र्यांनी कौतुक वाटले आहे. त्यांच्या या दुतोंडी वक्‍तव्यामुळे त्यांचेच दात त्यांच्या घशात गेले आहेत.

वास्तविक पाहता बैठक कोणी बोलावली? कोणी मागणी केली ? हा विषय महत्वाचा नसून, तीव्र दुष्काळाच्या परिस्थितीवर मानवी प्रयत्नांद्वारे उपाययोजना करणे, त्या उपाययोजना दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचत आहे की नाही याची शहानिशा करणे, शासनाच्या माध्यमातून आणि अशासकीय संस्थांच्या माध्यमातून माण-खटाव, कोरेगाव पूर्व व उत्तर भाग, खंडाळा, फलटण पूर्व व उत्तर भाग तालुक्‍यातील जनतेला दिलासा देण्याचा सामूहिक प्रयत्न होणे आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे, वळीवाचा एकही जोरदार पाउस जिल्ह्यात झालेला नाही, दुष्काळग्रतांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चारा छावण्या, टॅंकरची उपलब्धता, धरणातील पाणी सोडण्याची आवर्तने, जिल्ह्यातील धरणात असलेल्या पाण्याची चालवलेली पळवापळवी, जनावरांना चारा दावणीला देणे, चार छावण्यांच्या ठिकाणी जनावरांच्या डॉक्‍टरची सुविधा उपलब्ध करुन देणे, चारा छावणीतील जनावरांच्या काळजीसाठी थांबलेल्या मालकांना रोजगार हमी योजनेतून दिवसाला रक्‍कम देणे, या आणि अशा समस्यांच्या निवारणासाठी सर्व संबंधित खात्यांच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची टंचाई निवारण बैठक बोलावण्याची आम्ही केलेली मागणी लोकप्रतिनिधी म्हणून कायदेशीर व सुयोग्य आहे, यामध्ये कोणताही स्टंट नाही.

नेहमीच फक्‍त स्टंट करणाऱ्या पालकमंत्र्यांना म्हणूनच आमची कृती म्हणजे स्टंट वाटली असावी. आमचा जाब दुष्काळी जनतेच्या हिताकरीता होता. या बैठकीत अन्य सन्माननीय लोकप्रतिनिधींनी विविध खात्याच्या संदर्भात तक्रारी मांडल्या, परंतु पालकमंत्री यांना आमचीच टीका-टिप्पणी झोंबली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)