बंगळुरू : भाजपचे कर्नाटकातील प्रमुख नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी जेडीएसच्या एका आमदाराच्या मुलाशी फोनवर चर्चा करून त्यांना कोट्यावधी रूपयांची लाच देऊन फोडण्याचा प्रयत्न केला होता असे त्यांच्या ऑडिओ टेपवरून उघड झाले असून या प्रकरणाची आता एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेतच ही घोषणा केली.
या प्रकरणात आपलेही नाव गोवले गेले असून यातील तथ्य बाहेर येण्यासाठी याची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी सुचना सभापती रमेशकुमार यांनी सरकारला केली होती त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी अशी मागणी केली की ही चौकशी केवळ सभापतींचे यात नाव कसे आले या अनुषंगापुरतीच मर्यादित असावी अन्यथा या एसआयटी चौकशीचा दुरूपयोग होऊ शकतो. त्यावर सभापतींनी मुख्यमंत्र्यांना असा आदेश दिला की या चौकशीतून राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न होऊ नये केवळ सत्त्य समोर येण्यासाठीच ही चौकशी झाली पाहिजे असे सभापतींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
सत्तारूढ आघाडीचे जे आमदार भाजपला मदत करतील त्यांच्या बाबतीत त्यांना अनुकुल असाच निर्णय सभापती देतील यासाठी सभापतींनाहीं 50 कोटी देण्यात येणार आहेत असे येडियुरप्पा यांनी आपल्या संभाषणात म्हटले असल्याचे या ऑडिओ टेप मधून स्पष्ट होत आहे. दरम्यान येडियुरप्पा यांनी आपल्यावरील हा आरोप स्पष्ट फेटाळला असून आपल्यावरील आरोप सिद्ध झाला तर आपण राजकारणातूनच निवृत्त होऊ असे त्यांनी म्हटले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा