जाकार्ता – भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू हिने धडाकेबाज कामगिरीचा सपाटा कायम ठेवताना इंडोनेशियन बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम फेरीत स्थान मिळविले. तिने ऑल इंग्लंड विजेती खेळाडू चेन युई हिच्यावर 21-19, 21-10 असा सनसनाटी विजय नोंदविला. या मोसमात तिने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. तिच्यापुढे विजेतेपदासाठी जपानच्या अकेनी यामागुची हिचे आव्हान असणार आहे.
चेन हिने यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियन, स्विस खुली या स्पर्धांमध्येही अजिंक्यपद मिळविले होते. त्यामुळेच सिंधूविरूद्ध तिचे पारडे जड मानले गेले होते. तथापि सिंधूने संयमी खेळ करीत विजय मिळविला. पहिल्या गेममध्ये सिंधू 4-7 अशी पिछाडीवर होती. मात्र, तिने हळुह्ळु तिने पिछाडी भरून काढण्यास सुरूवात केली. चेनने केलेल्या चुकांमुळे सिंधूने सलग पाच गुणांची कमाई केली. चेनने 15-12 अशी आघाडी मिळविली होती. त्यावेळी सामन्याचे पारडे तिच्या बाजूने झुकले होते. सिंधूने चिवट झुंज देत 18-18 अशी बरोबरी साधली. साहजिकच चेनवर दडपण आले. सिंधूने शांतचित्ताने खेळ केला. ही गेम घेण्यात तिला यश मिळाले.
दुसऱ्या गेममध्ये पुन्हा चेनने सुरूवातीला 4-0 अशी आघाडी घेतली होती. परंतु जिगरबाज खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या सिंधूने बरोबरी साधली. तिने सलग सात गुणांची कमाई केली. तिने गेमवर नियंत्रण ठेवीत चेन हिला फारशी संधी दिली नाही. ही गेम घेत तिने सामनाही जिंकला. यामागुचीविरूद्ध आतापर्यंत झालेल्या 14 सामन्यांपैकी 10 सामन्यांमध्ये सिंधूला विजय मिळाला आहे.