सिंदखेड राजा युतीकडे, तर लोणार पुन्हा कॉंग्रेसच्या हाती

बुलडाणा/पालघर: बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि लोणार नगरपालिकेचा आज निकाल जाहीर करण्यात आल. सिंदखेड राजा नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे सतीश तायडे हे विजयी ठरले. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देविदास ठाकरे यांचा दीड हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.

सिंदखेड राजा नगरपालिकेवर शिवसेनेचे सात, राष्ट्रवादीचे आठ, भाजप आणि अपक्षचा प्रत्येकी एक-एक नगरसेवक विजयी झाला आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा नगरपालिकेची निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीची एक जास्त जागा आली तरी शिवसेनाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला आहे.
सिंदखेड राजा विधानसभेचे माजी आमदार आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि सिंदखेड राजा विधानसभेचे विद्यमान आमदार शशिकांत खेडेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र यामध्ये डॉ. शशिकांत खेडेकर यांनी बाजी मारत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पराभव केला आहे. त्यामुळे राजेंद्र शिंगणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

लोणार नगरपालिका सत्ता पलटण्याचा पायंडा यावेळेस मतदारांनी मोडीत काढला. लोणार नगरपालिकेच्या स्थापनेपासून लोणार शहरातील जनतेने कोणत्याच पक्षाला सलग दोनदा सत्ता दिली नव्हती. मात्र यावेळी लोणारवासियांनी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा एकहाती सत्ता दिली आहे.

लोणार नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे आज निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार पुनम मनिष पाटोळे या बहुमतांनी विजयी झाल्या. तसेच 17 जागांपैकी कॉंग्रेसचे 10 आणि शिवसेनेचे सात उमेदवार विजयी झाले.

पालघरमध्ये महायुतीला बहुमत, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले. मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार विराजमान होणार आहे. थेट जनतेतून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
पालघर नगरपरिषदेच्या 14 प्रभागांमधील 28 जागांचे निकाल आज जाहीर करण्यात आले. भाजप-शिवसेना-रिपाइं युतीने बहुमत मिळवत 21 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीला 2, तर अपक्षांना 5 जागा जिंकता आल्या. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे राष्ट्रवादीतून आलेल्या श्वेता पाटील, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे आणि शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार अंजली पाटील रिंगणात होत्या. राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीच्या उज्ज्वला काळे यांनी 1069 मतांनी विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)