जीवनगाणे: परिपक्‍वतेच्या खुणा

अरुण गोखले

असं म्हणतात की आम्रफळ हे परिपक्‍व झालं की राघू म्हणज़ेच पोपट हा त्यावर चोच मारायला येतो. त्याप्रमाणेच परमार्थातही असे एक वचन सांगितले आहे की शिष्याची तेवढी तयारी झाली की….
गुरू आपैसा भेटे ।
पण ही परिपक्‍वता त्या फळाला किंवा त्या व्यक्‍तीला आली आहे का नाही? हे ज्यावरून ओळखले जाते, त्याच असतात परिपक्‍वतेच्या खुणा.
आधी झाडाला कैरी लागते, मग ती पाडाला येते, तिचा रंग बदललो, तिचे काठिण्य जाऊन तिच्यात मुलायमता येते. स्वाद आणि अस्वादही बदलतो. रूप, रंग आणि सुवास यावरून फळाच्या परिपक्‍वतेचा अंदाज बांधता येतो. त्या सर्व खुणा दिसल्या की मगच आपण अनुमान काढतो की आता हे फळ परिपूर्ण झालेले आहे.
हे जसं फळाच्या बाबतीत, तसंच ते फुलांच्याही बाबतीत. फुलंसुद्धा आधी छोट्याशा कलिकेच्या रूपात असतात. मग त्या कळ्या बहरतात फुलतात, उमलतात आणि आपल्या अनोख्या रूप, रस, गंध आणि आकर्षकपणाने साऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. मग कोणाला ते फूल तोडून केसात माळावेसे वाटते, दुसऱ्याला आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून द्यावेसे वाटते. किंवा सश्रद्ध मनाने तेच फूल प्रभू चरणावर समर्पित करावेसे वाटते. पण केव्हा ? जेव्हा ते त्याच्या परिपूर्ण अशा अवस्थेस आलेले असते तेव्हा.
माणसाचंही याहून काही फार वेगळं असत असं नाही. एक सुजाण व्यक्ती म्हणून, सहृदयी माणूस म्हणून समोरची व्यक्‍ती तयार झालेली आहे का नाही? याची परीक्षाही आपल्याला त्याच्या अशाच काही खुणांवरून घेता येते.
जी व्यक्‍ती जीवनातील भल्या- बुऱ्या अनुभवातून खऱ्या अर्थाने शिकून तयार झाली आहे. त्या व्यक्‍तीची वृत्ती नम्र असते. तो सर्वांशी प्रेमाने, आदराने, सहृदयतेने वागतो. त्याची वाणी मधुर असते. त्याच्या वाणीला आपलेपणाचा, स्नेहाचा ओलावा आणि गोडवा असतो. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा व्यक्‍तीकडे पाहिले ना तरी त्याच्या अंतरीचे सुख आणि समाधान हे त्याच्या शांत प्रसन्न आणि सुहास्य अशा चेहऱ्यावरुन लक्षात येते.
त्याच्या पायी न सांगतासवरताही आपला माथा विनम्र होतो. त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आदर आणि प्रेम निर्माण होते. ही अशी परिपक्‍वता प्रत्येकाच्यातच कमी जास्त प्रमाणात असते. ती ओळखून टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा लागतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)