पंजाब मंत्रिमंडळातील सहकाऱ्यानेच केली सिद्धूंच्या राजीनाम्याची मागणी 

चंडीगढ: पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांची शाब्दिक बॅटींग मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनाच रूचत नसल्याचे समोर आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यावरून त्या राज्याचे एक मंत्री त्रिपतराजिंदरसिंग बाजवा यांनी थेट सिद्धूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पाकिस्तान दौऱ्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सिद्धू यांनी शुक्रवारी त्यांची भूमिका मांडली. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मला पाकिस्तानला पाठवल्याचे त्यांनी म्हटले. एवढेच नव्हे तर, राहुल हे कॅप्टनचेही (अमरिंदर) कॅप्टन आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यावरून बाजवा यांनी सिद्धूंना लक्ष्य केले. अमरिंदर यांना नेते मानत नसल्यास सिद्धूंनी नैतिक आधारावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. राहुल जे कार्य सोपवतील ते सिद्धूंनी करावे, असे बाजवा म्हणाले. अर्थात, राहुल हे कॉंग्रेसमधील प्रत्येकाचेच कॅप्टन आहेत. मात्र, अमरिंदर यांच्याविषयीचे सिद्धूंचे वक्तव्य मान्य करण्याजोगे नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. सिद्धूंनी कमी बोलावे आणि कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

-Ads-

सिद्धू यांचे घूमजाव : राहुल यांनीच मला पाकिस्तानला पाठवले, या दाव्यावरून सिद्धू यांनी शनिवारी घूमजाव केले. राहुल यांनी मला पाकिस्तानला जाण्यास सांगितले नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेल्या वैयक्तिक निमंत्रणावरून मी त्या देशाचा दौरा केला, असे ट्विट सिद्धू यांनी केले. पाकिस्तान दौऱ्यावरून विरोधक सिद्धू यांना टीकेचे लक्ष्य करत आहेत. राहुल त्या टीकेच्या निशाण्यावर येऊ नयेत यासाठीच सिद्धू यांनी सारवासारव केल्याचे मानले जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)