नगराध्यक्ष पोटे यांचा एकछत्री अंमल टिकविणार का ?

दत्तवाडी प्रभाग क्र.1 : श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक रणसंग्राम

अर्शद आ. शेख

हे आहेत दत्तवाडी प्रभागातून इच्छुक

भाजपकडून मनोहर पोटे, संगीता सतीश मखरे, सुजाता राजेंद्र खेडकर, उषा भाऊसाहेब मखरे, एस.पी. मखरे तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसतर्फे पांडुरंग कैलास पोटे, राजाभाऊ लोखंडे, शालिनी कालीचरण मखरे, संजय मखरे, आशाबाई बबनराव लोखंडे, कांतीलाल लोखंडे, संजय खेतमाळीस, दिपक लोखंडे, बालु मखरे आदींची नावे चर्चेत आहेत.

श्रीगोंदे – मागील तीन पंचवार्षिक निवडणूकीत विजय मिळवीत नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दत्तवाडी प्रभागावर आपली राजकीय पकड मजबूत केली होती. जानेवारी (2019) मध्ये होणाऱ्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत पोटे आपला गड राखण्यात यशस्वी होतील का? डझनभर विरोधक वज्रमूठ बांधून पोटे यांच्या बालेकिल्यास सुरुंग लावून विजयश्री खेचून आणतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

1999 पासून मनोहर पोटे येथून विजयी झाले. नगराध्यक्ष निवडणुकीत यापूर्वी ते थोड्या मतांनी हरले होते. सर्वात तरुण नगरसेवक ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा एकनिष्ठ सैनिक ही त्यांची प्रतिमा आहे. या निवडणुकीत त्यांच्या निष्ठेची कसोटी लागणार असे दिसते.या वॉर्डातील पोटेंच्या विरोधकांनी पराभवाने न डगमगता त्यांच्याशी कडवी झुंज सुरूच ठेवली आहे. पोटे, मखरे व लोखंडे या तीन आडनावांभोवती या प्रभागाचे राजकारण फिरत असते. मराठा समाजाचे या मतदारसंघात प्राबल्य आहे.

प्रभागाची व्याप्ती

दत्तवाडी प्रभाग क्र. 1 मध्ये मखरेवाडी, दत्तवाडी, लोखंडेवाडी, थडग्याचा मळा, बोरुडेवाडी, भांबाचा मळा, रजीष्टर मळा, खेडकर मळा या परिसराचा समावेश आहे. या प्रभागात सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला अशा दोन जागा आहेत.

नातेगोते या निवडणुकीत महत्वाचा घटक आहे. 2014 साली मनोहर पोटे विरुद्ध राजाभाऊ लोखंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पोटे यांनी एकतर्फी विजय मिळवीत लोखंडे यांचा 770 मतांनी पराभव केला. तर याच प्रभागातुन संगीता सतीश मखरे विरुद्ध अरुणा कैलास पोटे यांच्यात दुसरी लढत झाली. मखरे यांनी 416 मतांची आघाडी घेत संगिता पोटे यांना पराभूत केले.

आगामी (2019) निवडणुकीत मनोहर पोटे यांच्या पत्नी शुभांगी या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. तर मनोहर पोटे हे दत्तवाडी प्रभागात भाजपकडून सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढविण्यास सज्ज आहेत. त्यांचे चुलते व पारंपरिक विरोधक कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास पोटे हे यावेळी चिरंजीव पांडुरंग यास मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत. शिवाय 2014 चा पराभव पुसण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून राजाभाऊ लोखंडे देखील मैदानात उतरतील, असे दिसते.

याच प्रभागातील दुसऱ्या सर्वसाधारण जागेवर देखील रंगतदार लढत होणार आहे. सलग दोनदा निवडुन आलेले सतीश मखरे (भाजप) हे पत्नी संगीता यांस पुन्हा मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या विरोधात शालिनी कालीचरण मखरे राष्ट्रवादी-कॉंग्रेसकडून इच्छुक असून त्यांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत दत्तवाडी प्रभागातील नागरिक कोणाला पसंती देतात याकडे राजकीय वर्तुळासह शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)