मराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू 

संग्रहित छायाचित्र

मुंबई – आता आंदोलन करू नका, 1 डिसेंबरला जल्लोष करा…’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकेतानंतर आता मराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. मराठा आरक्षणाचे सर्व श्रेय भाजपाला जाऊ नये यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा अहवाल सभागृहात मांडला जावा, अशी मागणी जोर धरू लागली असून सत्ताधारी शिवसेना आणि विरोधकांनी तशी रणनीतीही आखली आहे. दरम्यान सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल मांडला जाणार आहे.

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांना सुपूर्द करण्यात आला. या अहवालात आयोगाने कोणत्या शिफारशी केल्या आहेत, याबाबत सर्वांची उत्कंठा ताणली असतानाच मुख्यमंत्र्यांनी 1 डिसेंबरला जल्लोष करा, असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकिय पक्षांमध्ये चुळबूळ सुरु झाली असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मराठा आरक्षणाचे सर्व श्रेय भाजपाला जाऊ नये यासाठी सत्ताधारी शिवसेना व कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खलबते सुरु झाली आहेत.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द होत असतानाच मराठा आरक्षणसाठी उपोषण करणाऱ्या सकल मराठा क्रांती मोर्चाने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आरक्षणाची घोषणा करा, अशी मागणी केली आहे. राज्य मागास आयोगाने मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलेल्या अहवालात सकारात्मक शिफारस केली असेल तर अतिशय आनंद आहे. सरकारने तातडीने कॅबिनेट समोर हा अहवाल ठेवून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अस्तित्वातील आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण जाहीर करावे, असे आवाहन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिवसेनेनेही पहिल्यापासून आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे मागासवर्ग आयोगाचा अहवाल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सादर करावा या मागणीसाठी शिवसेनाही आक्रमक भूमिका घेणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच सरकारने विनाविलंब या अहवालातील शिफारशी जनतेसमोर ठेवाव्यात आणि मराठा आरक्षण लागू करण्यास अधिक वेळकाढूपणा करू नये, असा इशारा कॉंग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

सनदी अधिकाऱ्यांचा अभ्यास सुरु 
राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर मुख्य सचिव डी.के.जैन यांनी यावर अभ्यास करुन पुढील पावले उचलली जातील, अशी प्रतिक्रिया दिली होती. सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाला तीन दिवस शिल्लक असून रविवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत अहवाल ठेवला जाणार असल्याने आज सामान्य प्रशासन, सामाजिक न्याय, विधि व न्याय या विभागाच्या सचिवांच्या दिवसभर बैठका सुरु होत्या. मंत्रालयात रात्री उशिरापर्यंत अहवालावर या सनदी अधिकाऱ्यांचा अभ्यास सुरु होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)