टिपण : शरद पवार आणि ‘यू टर्न’ चा इतिहास

-शेखर कानेटकर

चारवेळा मुख्यमंत्री, सहा वेळा आमदार, सात वेळा खासदार, लोकसभा व विधानसभेतील विरोधी पक्षनेता केंद्रात व राज्यात दीर्घकाळ कॅबिनेट मंत्री राहिलेले पवार यांना वारंवार यू टर्न घेण्याची सवय आहे. त्याचा इतिहास हा असा आहे…

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच साडेपाच वर्षांपूर्वी आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकणार नाही अशी घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या सभागृहात प्रवेश केला होता. पण आता मात्र लोकसभेच्या येत्या सतराव्या निवडणुकीसाठी त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याचे ठरविले आहे. पवार यांच्या या कृतीचे “यू टर्न’ असे वर्णन करून त्याबद्दल विविध तर्क-वितर्क केले जात आहेत.

तब्बल 51 वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत पवार यांचा हा काही पहिला यू टर्न नाही. राजकीय सोईसाठी आतापर्यंत त्यांनी खूप यू टर्न घेतल्याची उदारहणे आहेत. त्याचा इतिहास पाहायला हवा. 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्यानंतर शरद पवार यांनी समाजवादी कॉंग्रेसची वेगळी चूल मांडली. पुलोद सरकार स्थापन केले. त्यानंतर काही वर्षातच या पक्षाचे चंबूगबाळे आवरून त्यांनी औरंगाबादला राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा कॉंग्रेस प्रवेश केला.

त्यानंतर सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केल्याने त्यांची कॉंग्रेसमधून गच्छंती झाली. तेव्हा 1999 मध्ये पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. नंतर 19 वर्षानंतरही हा त्यांचा पक्ष अजूनही अस्तित्वात आहे. पण सोनिया गांधी यांच्या परकीयत्वाच्या मुद्यावरून लगेचच “यू टर्न’घेत 1999 मध्येच त्यांनी कॉंग्रेसबरोबर महाराष्ट्रात आघाडी करून सत्ता स्थापन केली. वर्ष 2004 ते 2014 अशी सलग दहा वर्षे सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या युपीए सरकारात ते कॅबिनेट मंत्रीही राहिले.

राष्ट्रीय राजकारणात जायचे म्हणून पवार 1984 मध्ये पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. पण तेथे न रमल्याने ते 1985 मध्ये राजीनामा देऊन महाराष्ट्रात परत आले. वर्ष 1991 मध्ये पवारांना पुन्हा राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले. कॉंग्रेस उपाध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढवली. राव मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्रीही झाले. पण 1993 मधील मुंबईतील दंगलीनंतर त्यांना नरसिंहरावांनी परिस्थिती आटोक्‍यात आणण्याचे निमित्त करून मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परत पाठविले. त्यावेळी ते फारसे राजी नव्हतेच; पण राव यांच्य दबावामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात परत न जाण्याच्या निर्णयापासून त्यांना आणखी एकदा “यू टर्न’घ्यावा लागला.

वयाची पंच्चाहत्तरी गाठल्यावर पवार यांनी थेट निवडणूक लढण्याबाबत संन्यास घ्यायचे जाहीर केले होते. त्यानंतर ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवडूनही गेले. त्यांची तेथील सहा वर्षांची मुदत अजून संपायची आहे. पण 2019 च्या निवडणुकीचे वारे वाहायला लागल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पवार पुन्हा एकदा मूळ घोषणेपासून “यू टर्न’ घेत लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत. हा आग्रह त्यांनी 2014 मध्ये मानला नव्हता.

“पवार राज्यसभेत निवडून गेल्यावर मोदी लाटेला घाबरून मागील दाराने संसदेत गेले,’ अशी टीका काही जणांनी (विशेषत: भाजप नेत्यांनी) केली होती. पण पवार यांच्या घोषणेच्यावेळी “मोदी लाटे’च्या प्रभावाचा तेवढा अंदाजही आलेला नव्हता. पवार यांनी 1967 पासून विधानसभेच्या सहा आणि 2009 पर्यंत लोकसभेच्या सात निवडणुका सलग व मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. त्यामुळे पराभवाच्या भीतीने त्यांनी पळ काढला हे सहज पटत नाही. निवडणूक रिंगणात ते अजून अपराजित आहेत.

यंदा पुन्हा निवडणूक लढविण्याचे पवार यांनी का ठरविले असावे याबद्दल पुन्हा अंदाज बांधले जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गटबाजीचा परिणाम होऊन माढ्याची हातची जागा जाऊ नये म्हणून पवार मैदानात उतरल्याचे बोलले जाते.
देशातील विरोधी पक्षांची आघाडी झाली, यदाकदाचित बहुमताची मोट बांधली गेली तर सर्वमान्य नेता म्हणून मान्यता मिळून पंतप्रधानपद मिळेल या आशेने पवार संधी घेत आहेत, असा एक तर्क आहे. पण याची शक्‍यता धूसर वाटते. त्याचे मुख्य कारण संख्याबळ. राष्ट्रवादी कॉंग्रेस मुळातच फक्‍त 24 जागा लढविणार आहे. त्यातून दहा जिंकण्याची तयारी चालू असल्याच्या बातम्या आहेत.

त्यापेक्षा राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या यापूर्वी जास्त राहिली आहे. त्यामुळे ही मंडळी संधी सोडण्याची शक्‍यता कमी. शिवाय पंतप्रधानपदासाठी संख्याबळाचा (राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या) मुद्दा पवार यांनी स्वत: यापूर्वीच मांडला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)