भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकची बॉलिवूडमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाची व्यक्तीरेखा साकारणार होती.
या बायोपिकच्या तयारीसाठी सायना आणि श्रद्धा एकमेकींना भेटल्यासुद्धा होत्या. एवढेच नव्हे तर सायनाची भूमिका साकारण्यासाठी श्रद्धाने बॅडमिंटनचे धडे घेण्यासही सुरुवात केली होती. मात्र आता श्रद्धाने हा बायोपिक अचानक सोडल्याची माहिती समोर आली आहे.
“साहो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने सायनाच्या बायोपिकसाठी वेळ देता येणार नसल्याचे कारण देत अचानक श्रद्धाने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. श्रद्धाच्या या तडकाफडकी निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धा खूप मेहनतही घेत होती. तसेच तिचा लूक टेस्टींगही झाले होते. श्रद्धाने हा चित्रपट सोडल्यावर आता तिची जागा परिणीती चोप्राची वर्णी लागणार असल्याचे समजते.
दरम्यान, श्रद्धाकडे सध्या दक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत “साहो’, तर वरुण धवनचा एबीसीडी सीरीजमधील “स्ट्रीट डान्सर’ आणि टायगर श्रॉफचा “बागी 3′ असे बिग बजेट चित्रपट आहेत. या व्यग्र वेळापत्रकामुळे सायनाच्या बायोपिकला वेळ देता येत नसल्याचे श्रद्धाने सांगितले.