भाजप-सेनेला भीमशक्तीची ताकद दाखवू

आरपीआय(आठवले गट) कार्यकर्त्यांची विरोधात घोषणाबाजी


कार्यकर्त्यांचे रिपब्लिकन पक्षातील पदाचे राजीनामे

पुणे – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना जागा वाटपात आणि कार्यकर्त्यांना महामंडळ वाटपात भाजप-सेनेकडून डावलल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश शिंदे आणि मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाने मोदी सरकार स्थापण्यासाठी जीवतोड मेहनत केली. मात्र, सध्या त्यांची अवहेलना होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेविरोधात प्रचार करून “भीमशक्तीची ताकद दाखवून देऊ, असा इशारा साठे आणि शिंदे यांनी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिला.

यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पश्‍चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता आठवले, माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, पश्‍चिम महाराष्ट्र कामगार आघाडीचे अनिल मोरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.

केंद्रात दोन मंत्रीपद आणि सत्तेत 10 टक्‍के वाटा देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले. ती पाळली नाहीत. कामगार महामंडळावर नियुक्ती करू असे सांगत झुलवत ठेवले. नुकत्याच जाहीर केलेल्या महामंडळ नियुक्‍त्यांमध्ये चळवळीशी संबंध नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून भाजपने जातीयवादी भूमिका दाखवून दिली आहे. त्यामुळेच आपण पदाचा राजीनामा देत असून, यापुढे भाजपविरोधात काम करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

राज्यभर फिरून भाजपविरोधात प्रचार
राज्यातील 19 पेक्षा जास्त जिल्ह्यात मातंग चळवळ कार्यरत आहे. अण्णा भाऊ साठे मंडळावर नियुक्ती करण्याचे वारंवार आश्‍वासन दिले गेले. मात्र, ते पाळले नाही. मातंग समाजाचे प्रश्‍न सोडवले नाहीत. त्यामुळे यापुढे भाजपला रिपब्लिकन जनता मतदान करणार नाही. राज्यभर फिरून भाजपविरोधात प्रचार करणार आहोत. मातंग समाज, कामगार यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांनाच निवडून देण्याचे आवाहन करणार आहोत. निष्ठावान कार्यकर्त्यांना भाजपकडून डावलण्यात येत आहे. त्यामुळे मातंग आघाडीची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. तसेच येत्या 10 एप्रिलपर्यंत राजकीय भूमिका स्पष्ट करू, असे साठे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)