शौरी, सिन्हांनी दाखल केली राफेल प्रकरणाच्या फेरविचारासाठीची याचिका

नवी दिल्ली: राफेल विमान घोटाळ्याच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याचा फेरविचार करावा अशी मागणी करणारी याचिका आज माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरूण शौरी आणि कायदे तज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

सरकारने कोर्टात जी चुकीची माहिती सादर केली आहे त्या आधारावर कोर्टाने हा निकाल दिला असल्याने त्या निकालाचाही आता फेर विचार होण्याची गरज आहे असे त्यांनी या याचिकेत नमूद केले आहे. सरकारने बंद पाकिटात राफेल प्रकरणातील माहिती सादर केली असली तरी या कागदपत्रावर कोणाचीही स्वाक्षरीही नाही असे त्यांनी या याचिकेत म्हटले आहे.

या प्रकरणाच्या फेर आढावा प्रकरणाची सुनावणी खुल्या कोर्टात व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी यात व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 14 डिसेंबर रोजी दिलेल्या निकालात शौरी, सिन्हा आणि भूषण यांची याचिका फेटाळून लावली होती. सरकारच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेविषयी शंका घेण्यास जागा नाही असे कोर्टाने नमूद केले होते. त्यामुळे राफेल करार रद्द करता येणार नाही असेही कोर्टाने नमूद केले होते.

दरम्यान सरकारनेही निकालातील काही निष्कर्षांबाबत दुरूस्ती करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. राफेल प्रकरणाचा कॅगचा अहवाल आला आहे आणि तो संसदेच्या लोकलेखा समितीनेही तपासला आहे असे विधान न्यायालयाने निकालपत्रात केले आहे. पण राफेल प्रकरणाचा कॅगचा अहवालाच अजून तयार झालेला नाही ही वस्तुस्थिती कॉंग्रेसने निदर्शनाला आणून दिल्यानंतर सरकारने आमच्या माहितीचा न्यायालयाकडून गैर अर्थ लावला गेला आहे, त्यात दुरूस्ती करण्याची विनंती आम्ही न्यायालयाला करणार आहोत अशी भूमिका घेतली आहे. त्यानुसार सरकारनेही आता दुरूस्ती याचिका दाखल केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)