खांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 3)

-डाॅ. पियुष नाशिककर

खांदा निरोगी राखण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खांद्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करणे आणि आवश्‍यक तेव्हा अस्थिरोगतज्ज्ञाचा सल्ला घेण्यास टाळाटाळ न करणे. तज्ज्ञाचा सल्ला घेणे म्हणजे शस्त्रक्रिया नव्हे, तर एक निरोगी खांदा पूर्ववत प्राप्त करण्याची हमी नक्कीच आहे.

-Ads-

खांदे-दुखीवर घरगुती उपचार कोणते ?

खांद्याच्या वेदना क्षुल्लक दुखापतीमुळे होत असतील तर घरगुती उपचारांचा विचार केला जाऊ शकतो. तथापि त्याकडे दुर्लक्ष करू नये. खांदा सामान्य स्थितीत येण्यास काही दिवस लागतात. खांद्याच्या संरक्षणासाठी विश्रांती घ्यावी. सूज व दुखणे बर्फाच्या शेकाने कमी होऊ शकते. खांद्याच्या संरक्षण व आधारासाठी सपोर्टिंग स्लींगचा वापर होऊ शकतो. सौम्य मालीश दुखणे बरे करण्यास मदत करू शकते, पण मार लागला असल्यास ते टाळावे.

एक किंवा दोन आठवडे विश्रांती खांदा दुखीवर पुरेशी आहे, पण त्यापेक्षा जास्त विश्रांती घेऊ नये, कारण त्यामुळे खांद्याची हालचाल कमी होऊ शकते. म्हणून खांद्याचे व्यायाम सुरु करणे आवश्‍यक असते. व्यायाम सोपे आहेत व ते सहजपणे इंटरनेटवर शोधले जाऊ शकतात. खांद्याच्या वेदना व सुजेवर औषधांद्वारे (ओवर द काऊंटर ) लवकर आराम मिळू शकतो. जर खांद्यावर शास्त्रक्रिया झाली असेल तर शस्त्रकियेनंतर दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे. वेदना आणि सूज कमी झाल्यावरच खेळांमध्ये सहभागाचा विचार होऊ शकतो. घरगुती उपचारांचा फायदा होत नसेल तर अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

खांद्याच्या दुखापतीपासून बचाव कसा करावा ?

खांदा दुखापती रोखण्यासाठी खांद्यावर अतिरिक्त ताण देण्याचे टाळावे. खेळामध्ये सहभागी असाल किंवा व्यायाम करू इच्छित असाल, तर योग्य तंत्र व कौशल्य शिकणे महत्त्वाचे आहे. वृद्धांची हाडे कमजोर व स्नायू कमी लवचीक असतात. त्यांनी जड वस्तू उचलताना विशेष काळजी घ्यावी. जड वस्तू खांद्याच्या पातळीपेक्षा वर उचलणे टाळावे. वारंवार डोक्‍याच्या पातळीपेक्षा वर करावी लागणारी कामे टाळावी किंवा कामात अनुरूप बदल करून घ्यावा.

जड वस्तू (5 किलोपेक्षा जास्त) घेऊन जाणे आवश्‍यक असेल तर तिला शरीरानजीक घेऊन उचलावे. शरीरापासून दूर भार उचलल्यास खांद्यावर अतिरिक्त ताण पडतो. खांद्याची वारंवार हालचाल करावी लागणारी कामे करताना अधूनमधून आवश्‍यक तेवढी विश्रांती घ्यावी. रोजच्या वापरावयाच्या वस्तू सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी ठेवाव्या.

खांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 1)

खांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 2)

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)