खांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 1)

-डाॅ. पियुष नाशिककर

खांदा निरोगी राखण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खांद्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करणे आणि आवश्‍यक तेव्हा अस्थिरोगतज्ज्ञाचा सल्ला घेण्यास टाळाटाळ न करणे. तज्ज्ञाचा सल्ला घेणे म्हणजे शस्त्रक्रिया नव्हे, तर एक निरोगी खांदा पूर्ववत प्राप्त करण्याची हमी नक्कीच आहे.

-Ads-

साठीतली एक सेवानिवृत्त शिक्षिका बाहय-रुग्ण विभागात आली. तिचे दोन्ही खांदे अनेक वर्षापासून दुखायचे आणि त्या त्रासा बरोबर जगायचे तिने स्वीकारले होते. पण अलीकडे तिला उजव्या खांद्याचा त्रास असहनीय झाला होता. ब-याच कामांसाठी तिला दुस-यांवर अवलंबून राहावे लागायचे. मग ते केस विंचरणे असो, कपडे बदलणे वा आंघोळ करणे. वेदनांमुळे तिच्या अनेक रात्री निद्रारहित जाऊ लागल्या. स्वावलंबी अशी ती खंबीर व्यक्ती खांद्याच्या त्रासामुळे आपला आत्मविश्वास गमावत चालली होती. मला खात्री आहे; बरेच जण या वृद्ध महिलेचा त्रास स्वत:च्या खांदे दुखीशी परस्पर संबधित करू शकतील. तरुणांमध्ये सुद्धा खांद्याचा त्रास भरपूर प्रमाणात आढळतो ज्यामुळे त्यांना आवडीच्या छंदांना (खेळ, कसरत इ.) अलविदा करावा लागतो.

खांदा दुखणे किती सामान्य आहे ?

स्नायु आणि अस्थिचे दोष बघता खांदा-दुखी ही पाठदुखी आणि मानेच्या दुखण्यानंतर तिस-या क्रमांकावर आहे. भारतातील वाढती क्रीडा-संस्कृती आणि वाढत्या आयुर्मानामुळे यात दरवर्षी वाढ होत आहे. एका संशोधनानुसार एका व्यक्तीला पूर्ण जीवनकाळात खांदे दुखीचा त्रास होण्याची शक्‍यता 70% असते. खांद्याचा सांधा शरीरातला सर्वात लवचिक व हलणारा सांधा आहे. त्यामुळे इजेलाही संवेदनक्षम आहे. हा सांधा शारीरिक श्रम, खेळ आणि सततच्या हालचालीमुळे दुखावला जाऊ शकतो. इजा झाली नाही, तरी वाढत्या वयात खांद्याची झीज होऊ शकते. वयाच्या साठीनंतर खांद्याचे त्रास खूप प्रमाणात आढळून येतात.

खांदादुखीची सर्वसामान्य कारणे ?

खांदादुखीचे सर्वात सामान्य कारण म्हणजे रोटेटर कफ डिसऑर्डर (सिंड्रोम ) हे आहे. जेथे खांद्याभोवती असणा-या स्नायुंचे आवरण (रोटेटर कफ) खराब होते. हा दोष रोटेटरी कफला सूज आल्यामुळे, वारंवार इजेमुळे किंवा स्नायुतील कमकुवतपणामुळे होतो. ब-याच वेळा हा कफ फाटतो व त्यामुळे संधिवात होऊ शकतो. संधिवात हा वयोमानानुसार होणारा दोष आहे. ज्यामध्ये जसजसे वय वाढते तसतसे खांद्याच्या हाडावरचे संरक्षणात्मक आवरण नष्ट होते आणि खांद्यातली हाडे एकमेकांवर घासली जातात त्यामुळे ती दुखतात. ब-याचदा तरुणांमध्ये खांदा निखळणे हे पण त्रासाचे एक कारण होऊ शकते. फ्रोजन शोल्डर हा एक स्वयंमर्यादित दोष आहे. ज्यामध्ये सांध्याभोवतीचे स्नायु व कॅप्सूल आकुंचन पावतात आणि कडक होतात. त्यामुळे खांदे सुजतात व हालचाल मर्यादित होते. हा त्रास पन्नाशीतील मधुमेही रुग्णांना अधिक प्रमाणात होतो. कधी कधी खांदे-दुखी ही मानेच्या स्नायुं किंवा नसांच्या त्रासामुळे उद्भवू शकते.

खांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 2)

खांदा दुखणे एक वेदनादायक त्रास (भाग 3)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)