दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरले जावे- मोदी

पाकिस्तानवर इम्रान खान यांच्या उपस्थितीत साधला निशाणा

बिश्‍केक -दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या आणि दहशतवादासाठी निधी उपलब्ध करणाऱ्या देशांना त्यासाठी जबाबदार धरले जावे, अशी परखड भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मांडली. त्यातून त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीतच त्या देशावर नामोल्लेख टाळून निशाणा साधला.

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत केलेल्या भाषणात मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर तपशीलवार भूमिका मांडली. निष्पाप लोक दहशतवादाचे बळी ठरतात. त्यामुळे भारताला दहशतवादमुक्त समाज हवा आहे. दहशतवादाच्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी संकुचित दृष्टीकोन बाजूला ठेऊन सर्व देशांनी एकवटायला हवे. दहशतवादासंदर्भात जागतिक परिषद भरवण्याची गरज आहे.

त्यासाठी एससीओचे सदस्य असणाऱ्या देशांच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दहशतवादाचा मुकाबला करण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना, पर्यायी ऊर्जा, आरोग्य आदी क्षेत्रांमधील सहकार्यासाठी, शांततेसाठी आणि भरभराटीसाठी एससीओ देशांनी एकत्र येण्याची गरजही मोदींनी अधोरेखित केली. त्यांच्या भाषणावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग, इराणचे अध्यक्ष हसन रौहानी आदी उपस्थित होते.

बिश्‍केक ठरावात दहशतवादाचा निषेध

किरगिझस्तानची राजधानी बिश्‍केकमध्ये झालेल्या एससीओ परिषदेत एक ठराव मंजूर करण्यात आला. त्या बिश्‍केक ठरावात भारतासह इतर देशांनी दहशतवादाचा तीव्र निषेध केला. दहशतवाद आणि कट्टरतावाद यांच्याशी संबंधित कृत्यांचे समर्थन होऊ शकत नाही. दहशतवादामुळे सुरक्षाविषयक धोके निर्माण झाले आहेत. त्यामुळे दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सहकार्य वाढवायला हवे. त्याशिवाय, शस्त्रास्त्रांचा प्रसार, शस्त्रास्त्र स्पर्धा या आव्हानांकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्या ठरावात नमूद करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)