शहर अभियंत्यावर भिरकावला बूट

महापालिकेत शिवसेनेचा राडा : बोल्हेगाव रस्त्याच्या प्रश्‍नावरून शिवसेना आक्रमक

सर्व अभियंते बेमुदत रजेवर
शहर अभियंता सोनटक्के यांना अर्वाच्य शिवीगाळ व बुट फेकून मारल्याप्रकरणी महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. या घटनेच्या निषेधार्थ महापलिकेतील सर्व अभियंते आजपासून बेमुदत रजेवर जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

नगर – बोल्हेगाव येथील रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश देऊनही ठेकेदाराकडून काम सुरू होत नसल्याने व रस्त्याची खोदाई करून अर्धवट काम ठेवल्यामुळे आक्रमक शिवसेना नगरसेवकांनी उपनेते अनिल राठोड यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. त्याच वेळी शहर अभियंता विलास सोनटक्‍के यांच्याकडून रस्त्याच्या कामाबद्दल समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संप्तत झालेल्या शिवसेनेच्या एक पदाधिकाऱ्याने पायातील बूट काढून सोनटक्‍के यांच्या दिशेने भिरकावला. त्यामुळे महापालिकेत एकच गोंधळ झाला. या प्रकारामुळे महापालिकेत चांगलीच खळबळ उडाली आहे.

शिवसेनेच्या नगरसेवकांनी यापूर्वीही अनेकवेळा बोल्हेगाव रस्त्याच्या कामाबाबत आंदोलने केली आहेत. परंतु या रस्त्याचे काम सुरू न झाल्याने आज नगरसेविका कमल सप्रे यांचे पती दत्तात्रय सप्रे व नगरसेवक अशोक बडे यांनी महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांचे दालन गाठले. यावेळी शहर अभियंता सोनटक्‍के व अभियंता परिमल निकम उपस्थित होते. रस्त्याचे काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आयुक्‍तांनी सोमवारपर्यंत ठेकेदाराने काम सुरू केले नाही तर त्याला काळ्या यादी टाकण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. हे आश्‍वासन लेखी स्वरूपात येण्याची मागणी बडे व सप्रे यांनी केली. आयुक्‍त लेखी आश्‍वासन देण्यास तयार होते. परंतू बडे व सप्रे यांनी भूमिका बदलून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर सोनटक्‍के हे देखील वैतागले. हे काम का थांबले याची पोलखोल करू का असे ते म्हणाले. त्यामुळे नगरसेवकांसह यांच्यासमवेत आलेले नागरिक संप्तत झाले. त्यांनी आयुक्‍तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले.

शिवसेनेच्या नगरसेवकांचे आयुक्‍तांच्या दालनात आंदोलन सुरू केले. अधिकारी दाद देत नसल्याने नगरसेवकांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर राठोड महापालिकेत आले. त्यावेळी राठोड व अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमक झाली. अधिकाऱ्यांनी आठवडाभरात काम सुरू करण्याचे आश्‍वासन मागील आंदोलनावेळी दिले होते. त्यानंतर अद्यापही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्ता खोदून अर्धवट अवस्थेत काम सोडले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून ठेकेदार काम करत नसतांना महापालिका अधिकारी कारवाई का करत नाहीत? असा सवाल यावेळी अशोक बडे, दत्तात्रय सप्रे, निलेश भाकरे, अक्षय कातोरे, मदन आढावा यांनी उपस्थित केला.

राठोड यांनी देखील आयुक्तांना जाब विचारला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावातून हे काम सुरू होत नसल्याचा आरोप यावेळी काही कार्यकर्त्यांनी केला.अधिकारी ठेकेदारावर कारवाई करत नसल्याने आक्रमक कार्यकर्त्यांपैकी एकाने शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या दिशेने बूट भिरकावला. आयुक्तांच्या दालनात हा प्रकार घडल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)