नियोजनाअभावी सातारकरांवर टंचाईचे संकट

-तब्बल पावणेसहा कोटींची पाणीतूट
-पालिका अन्‌ प्राधिकरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
-संदीप राक्षे

सातारा  – नियोजनाच्या अभावामुळे सातारकरांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तब्बल पावणेसहा कोटीची पाणी तूट असल्याने पाणी वितरणाचा पालिकेचा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर गळती 28 टक्‍क्‍यावर गेल्याने शहराची पाणीबाणी आणि लोकसभेची वाणी अशी उपरोधिक चर्चा सुरू झाली आहे.

अपुऱ्या उपशामुळे “याचं काढून त्याला’ अन्‌ ओरड झाली, की “त्याचं काढून याला’ या प्राधिकरणाच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये टंचाईच्या तोंडावर असंतोषाचे वातावरण आहे. कृष्णा नदीवरील बंधाऱ्यातही खडखडाट सुरु झाल्याने धोमचा कोटा जलसंपदा विभागाने आवळला काय? हे समजायला मार्ग नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा शहराचा पूर्व भाग आणि लगतच्या उपनगरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. शाहूपुरी, विलासपूर, खिंडवाडी, संभाजीनगर, खेड, पिरवाडी, संगमनगर आदी भागास प्राधिकरण पाणी पुरवते. कृष्णा नदीतून पाणी उपसून ते विसावा येथे शुद्धकरण केले जाते आणि तेथून पाणी नागरिकांना पुरवले जाते. सध्या नदीतील पाण्याची पातळी खालावली आहे. प्रवाह कमी झाल्याने नदीवरील जॅकवेलजवळ पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी पाण्यात तूट येत आहे. ही तूट गेल्या दोन वर्षात दोन एमएलडीवर पोहचल्याने मुरणारे पाणी शोधण्याची वेळ आली आहे.

टंचाईच्या तोंडावर कृष्णा नदीत, जॅकवेलजवळ बंधारा बांधून पाण्याचा प्रवाह वळविण्याची व्यवस्था प्राधिकरण करते. त्यामुळे नदीपात्रातील उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर केला जातो. अद्याप प्राधिकरणाने हा बंधारा घातलेला नाही. परिणामी पाणी उपशात तूट येत असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शाहूपुरीत कृत्रिम टंचाई होती. तांत्रिक दोष दूर करण्यात दीर्घकाळानंतर प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले. तोपर्यंत पात्रातील पाणी कमी झाल्याने पुन्हा एकदा शाहूपुरीवासियांना कमी प्रमाणात पाणी मिळू लागले. नागरिकांनी आंदोलनाचा दिलेला इशारा लक्षात घेऊन ऐन वेळी शाहूपुरीकरिता कोटेश्वर टाकीचे पाणी वाढविण्यात आले.शाहूपुरीवासीय सुटकेचा निश्वास टाकत नाहीत, तोच सदरबझारमधील नागरिकांतून पाणी ओरड होऊ लागली आहे. दोन आठवड्यांपासून पाण्याचा दाब व वेळ कमी करण्यात आली असल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)