सरलेल्या आर्थिक वर्षात छोट्या कंपन्यांचा कमी परतावा

सेन्सेक्‍स वाढला तर स्मॉल व मिडकॅप घटला

नवी दिल्ली  -सरलेल्या आर्थिक वर्षात मुख्य निर्देशांकांनी चांगला परतावा दिला आहे. मात्र छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्मॉल कॅप आणि मिड कॅप पिछाडीवर पडले आहेत 2018-19 या आर्थिक वर्षात स्मॉल व मिड कॅप 11.6 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. तर मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्‍स मात्र 17.3 टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप सरलेल्या वर्षात 11.57 टक्‍क्‍यांनी म्हणजे 1967 अंकांनी कमी झाला तर मिडकॅप तीन टक्‍क्‍यांनी म्हणजे 482 अंकांनी कमी झाला आहे. त्याउलट सेन्सेक्‍स 5704 अंकांनी म्हणजे 17.3 टक्‍क्‍यांनी वाढला आहे.
त्याचबरोबर निफ्टीतही 14.93 टक्‍के वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात बॅंकिंग, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने ग्राहक वस्तू आणि औषधे क्षेत्रापेक्षा अधिक परतावा दिला असल्याचे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

सरलेल्या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा कमी झालेला दर, वाढलेले क्रूडचे दर, त्याचबरोबर अमेरिकेने अनेक देशांबरोबर सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे शेअर बाजारावर परिणाम झाला होता. आगामी काही काळही या मुद्द्याची टांगती तलवार कायम असणार आहे.

सर्वसाधारणपणे देशातील गुंतवणूकदार छोट्या कंपन्यांचे शेअर खरेदी करतात. तर परदेशातील गुंतवणूकदार मोठ्या कंपन्यांचे म्हणजे ब्लूचिप कंपन्यांचे शेअर खरेदी करीत असतात. मिडकॅपमधील कंपन्या मोठ्या कंपन्यांच्या सर्वसाधारणपणे 20 टक्‍के तर स्मॉल कॅपमधील कंपन्या मोठ्या कंपन्यांच्या 10 एवढ्या मोठ्या समजल्या जातात.

गेल्या वर्षात काही नकारात्मक घडामोडी घडल्या असल्या तरी अमेरिकेत मंदीमुळे व्याजदर कमी प्रमाणात वाढणार आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात भांडवल सुलभता निर्माण झाली आहे. परिणामी भारतात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. नायर यांनी सांगितले की, आता गुंतवणूकदारांचे लक्ष लोकसभा निवडणुकांकडे आहे. त्याचबरोबर लवकरच कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर होण्यास सुरुवात होणार आहेत. या सर्व घडामोडींचा परिणाम आगामी काळात निर्देशांकावर कमी-अधिक प्रमाणात होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here