शॉर्ट फिल्म कॉर्नर : राष्ट्रीय कर्तव्य

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्याने निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. संपूर्ण देशभर निवडणुकांचे वातावरण तयार होत आहे. तरुण कार्यकर्त्यांनी बूथ लेव्हलवर प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हेच तरुण कार्यकर्ते मतदानाविषयी किती जागरूक आहेत याबद्दल शंका आहे. असाच एक लघुपट आपण आज पाहणार आहोत.

‘राष्ट्रीय कर्तव्य’ या लघुपटाची सुरुवात मतदान केंद्र क्रमांक 34 पासून होते. मतदान केंद्रावर पोलीस सुरक्षक तसेच काही ऑफिसर असतात. तेवढ्यात तिथे बबन आणि केतन अशी दोन मुले टू व्हीलरवरून येतात. बबन त्या पोलिसांना आपली मतदानाची चिठ्ठी दाखवत कुठे मतदान करायचे विचारतो. यावर पोलीस बबनला म्हणतो, इथून थोडे पुढे चालत जा. आणि डावीकडे वळा. हे ऐकून बबन विचार करू लागतो व केतनला म्हणतो, एवढं आत चालत जायचे आणि परत डावीकडे वळायचे आणि तिथे लाईन असेल ती वेगळी. आणि आत गेल्यावर कागदपत्रांची चाळवाचाळव वेगळीच. चल त्यापेक्षा पार्टीला जाऊ, असे म्हणून बबन मागे वळतो आणि एका अपंगाला धडकतो. अपंगाची माफी मागण्यापेक्षा बबन त्यालाच उलटे विचारतो की, काय घाई आहे. यावर तो अपंग व्यक्ती उत्तर देतो की, हो घाई आहे. हक्कासाठी मतदान करायचं आहे. आणि तो चालत पुढे जातो. हे पाहून तेथील सर्व जण उभे राहतात. आणि त्या व्यक्तीला सलाम करतात.

बबन आणि केतन सुदृढ असूनही चालण्यास नकार देतात. परंतु, त्या अपंग व्यक्तीला त्याच्या जबाबदारीची जाणीव असून तो शारीरिक कष्ट झेलून मतदान करण्यास जातो. आज अनेक जण मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून घालवितात. मतदानादिवशी बाहेर फिरण्यास जातात आणि यामुळेच योग्य व्यक्ती निवडण्यापासून ते वंचित राहतात. दरवर्षी लाखो पटीने मतदारांची संख्या वाढत आहे. परंतु, मतदानाचा आकडा कमीच होताना दिसतो. लोकांना आजही आपल्या कर्तव्याची जाणीव नसल्याने अनेक राजकीय नेते त्याचा फायदा उचलतात. त्यामुळेच सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजवावा. जेणेकरून योग्य शासन आणि शासनकर्ते देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जातील.

– श्‍वेता शिगवण

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)