शॉर्ट फिल्म कॉर्नर : फुटबोर्ड – रेल्वे अपघात

स्टंटबाजी तरुणाईला काही नवीन राहिलेली नाही. अनेक तरुण बाईकवर, रेल्वे, बसमधून प्रवास करताना अथवा कोठेही आपला जीव धोक्‍यात घालून स्टंटबाजी करताना दिसतात. या नादात अनेक जणांना प्राणाला मुकावे लागते. धावत्या रेल्वेमध्ये असे स्टंट्‌स करून हे व्हिडीओज सोशल मिडीयावर व्हायरल करून पैसे कमावले जातात अशी बातमी सध्या माध्यमांमध्ये आहे. अवघ्या काही पैशांसाठी व आभासी ‘लाईक्‍स’साठी तरुण आपला अनमोल जीव धोक्‍यात घालू शकतात हे वास्तवच हादरवणारे आहे. अशा प्रकारची स्टंटबाजी किती महागात पडू शकते ते आपण आज ‘फुटबोर्ड’ या लघुपटातून पाहणार आहोत.

लघुपटाची सुरुवात लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या विशाल नावाच्या एका मुलापासून होते. विशालला त्याची मैत्रीण फोनवरून ट्रेनमधून व्यवस्थित प्रवास कर आणि फुटबोर्डवर उभा राहू नको असे बजावून सांगते. फोन ठेवल्यावर मात्र तो चालत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करण्यास सुरुवात करतो. धावत्या ट्रेनमधून हात बाहेर काढणे, एका पायावर उभे राहून बाकीचे शरीर हवेत सोडणे असे स्टंट्‌स करायला विशाल सुरुवात करतो. यावेळी त्याचा अनेकदा हात सूटत असतो व पायही घसरत असतो. तरीही त्याची स्टंटबाजी चालू असते. रेल्वेत असलेले अन्य लोक देखील विशालचे हे माकड चाळे मुकाट्याने बघत असतात. त्याचवेळी त्याला एका रेल्वे अपघाताचा मेसेज येतो, विशाल मेसेज वाचतच असतो तेवढ्यात त्याला दुसऱ्या ट्रॅक वरून धावणाऱ्या रेल्वेत एक तरुण स्टंट करताना दिसतो. विशाल त्या मुलाला उद्देशून, ‘सांभाळून नाहीतर मरशील!’ असा आवाज देतो. पुढच्याच सीनमध्ये विशालच्या समोर एक शीख मुलगा येतो आणि विशालला त्याचेच शब्द ऐकवतो ‘सांभाळून नाहीतर मरशील!’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर विशाल त्या शीख मुलाला वेड्यात काढत, “स्टंट करणे हे माझे रोजचे काम आहे. स्टंट करणे बच्चो का खेल नही,” असं ऐकवतो. यावर तो मुलगा विशालला म्हणतो की, मी ही तुझ्यासारखे स्टंट करायचो. माझ्या सर्व मित्रांमध्ये मी एक्‍सपर्ट होतो. परंतु, मी आता स्टंटबाजी करणे सोडून दिले आहे. व तो आपल्यासोबत झालेल्या प्रसंगाबद्दल सांगण्यास सुरुवात करतो.

एका दिवशी स्टंट करताना माझा हात सुटला आणि मी चालत्या रेल्वेतून खाली पडलो. विशाल त्या मुलाचा किस्सा ऐकून अचंबित होऊन विचारतो की, मित्र आले नाही का वाचवायला? त्यावर तो शीख मुलगा म्हणतो, अशावेळी कोणीही येत नाही. मी कित्येक तास तिथेच पडून होतो. काही वेळाने त्याठिकाणी चार मुले आली. त्यातील एकाने माझ्या खिशातून पैसे आणि मोबाईल चोरला. इतकेच नव्हे तर अन्य दोन मुलांनी माझा व्हिडिओही बनविला. मला पाच वर्षांची मुलगी आहे. पत्नी, आई, बाबा कोणाचाही विचार न करता मी स्टंट करायचो. एवढे सांगून तो शीख मुलगा, ‘माझे स्टेशन आले आहे मला उतरायला पाहिजे, तुला मेसेजवर एक फोटो आला होता तो डाउनलोड कर.’ असे बोलून चालत्या ट्रेनमधून उडी मारतो. त्या मुलाने धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याने धक्का बसलेला विशाल कसाबसा त्याला आलेला मेसेज मधला फोटो डाउनलोड करतो आणि त्याला चक्क त्याच शीख मुलाचा स्टंट करतानाचा अपघात दिसतो.

दोन मिनिटांची स्टंटबाजी कशा प्रकारे आपल्या जीवावर बेतू शकते याचे उत्तम चित्रण ‘फुटबोर्ड’ या शॉर्टफिल्ममधून करण्यात आले आहे. स्टंट करून आपला व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्‍यात घालू नका असा संदेश शॉर्टफिल्मद्वारे देण्यात आला आहे.

– श्‍वेता शिगवण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)