शॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है।

लघुपटाची सुरुवात मोहनदादा या सफाई कर्मचाऱ्यापासून होते. मोहनदादा रस्त्याच्या साफसफाईचे काम करत असतात. मोहनदादा रस्ता साफ करून थोडे पुढे सरकतात तेवढ्यात एक महिला आपल्या स्वयंपाकघराच्या खिडकीमधून साफ केलेल्या रस्त्यावर कचरा फेकते. मोहनदादा कोणतीही तक्रार न करता महिलेने साफ केलेल्या रस्त्यावर टाकलेला कचरा पुन्हा एकदा साफ करतात. तेवढ्यात गाडीवर बसलेला एक मुलगा देखील साफ केलेल्या जागेवर चॉकलेटचे रॅपर फेकतो, मोहनदादा तो चॉकलेटचा कागद देखील साफ करून घेतात. हे पाहून चहाच्या टपरीवर बसलेला पोस्टमन त्यांना म्हणतो की, मोहनदादा तुम्ही कचरा साफ करत राहणार आणि ही लोकं कचरा करतच राहणार आहेत. या देशाचे काही होऊ शकत नाही. तेवढ्यात तेथे एक माणूस थुंकतो. ते दाखवत पोस्टमन मोहनदादांना म्हणतो, बघितला ना. यावर मोहनदादा हसून म्हणतात, हो. होऊ शकते. केवळ अजून थोडी स्वच्छता करावी लागेल.

यानंतर पोस्टमन एक पत्र घेऊन कचरा करणाऱ्या त्या सर्वांचे दार ठोठावतो. आणि सर्वांना सांगतो की, ‘भारत’ नावाने तुम्हाला एक पत्र आले आहे. परंतु, ती लोकं आम्ही ‘भारत’ नावाच्या कोणालाही ओळखत नसल्याचे पोस्टमनला सांगतात. त्यावर पोस्टमन म्हणतो, वाचून तर पहा बहुतेक कोणी ओळखीचे असेल, असे म्हंटल्यावर सर्व जण ते पत्र घेतात आणि वाचण्यास सुरुवात करतात.

साष्टांग नमस्कर, तुम्ही मला ओळखत नाही. पण मी तुम्हाला खूप जवळून ओळखतो. अनेक वेळा ठिकठिकाणी आपण भेटलोही आहे. आणि प्रत्येक भेट एक आठवण बनत गेली. आठवतंय का तुम्हाला? मिश्राची बायको एकदा स्वयंपाकघरातून कचरा फेकत होती. तेव्हा तुम्हीच तर तिला रागवले होता. गांधी चौकाच्या समोरील भिंतीवर एक माणूस थुंकत असताना तुम्हीच त्यांना थांबविले होते. कुणी दुसऱ्याने टाकलेला कचरा जेव्हा तुम्ही उचलून कचऱ्याचा डब्यात टाकला. तेव्हा मला खूप अभिमान वाटला होता. माझ्यावर तुमचे खूप उपकार आहेत. नाहीतर या छोट्या-छोट्या गोष्टीबद्दल कोण विचार करतं? मी तुमचा आभारी आहे माझा एवढा आदर करण्यासाठी. मी आभारी आहे माझ्या प्रगतीत तुमच्या छोट्या पावलांसाठी. मी आभारी आहे मला महान बनवण्यासाठी. तुमचा भारत.

हे पत्र वाचून सर्व जण विचार करायला लागतात. दुसऱ्या दिवशी पोस्टमन मोहनदादांना म्हणतो, खरं बोलू का, मला नाही वाटत एवढ्या सोप्या मार्गाने ही लोक सुधारतील. तेवढ्यात आपल्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून कचरा टाकणारी महिला स्वतः कचरापेटीत कचरा टाकते. हे पाहून पोस्टमन म्हणतो, अभिनंदन मोहनदादा. आपला देश स्वच्छ होतो आहे. यावर मोहनदादा म्हणतात, नाही अजून एका पत्र देणे बाकी आहे असे म्हणत ते पत्र आपल्यासमोर पुढे करतात.

प्रत्येकजण आज स्वच्छतेच्या गोष्टी करतो. परंतु, ती कृती स्वतः क्वचितच करताना दिसतात. हातातला कचरा कोठेही टाकण्याची आपल्याला एकप्रकारची सवय लागली आहे. प्रत्येकाने जरी स्वतःचा कचरा कचरापेटीत टाकला. तर आपला भारत देश एक दिवस नक्कीच स्वच्छ होईल व अधिक महान बनेल.

– श्‍वेता शिगवण

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)