शिवसेनेची कॉंग्रेस-राष्ट्रवादीची “सेटींग’ फसली : रामदास कदम यांचा गौप्यस्फोट

मुंबई: अहमदनगर महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणूकीत भाजपाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठींबा दिल्याबद्दल अनेक तर्क-वितर्क काढले जात होते. मात्र, या पालिकेवर आपलीच सत्ता स्थापन व्हावी यासाठी खुद्द शिवसेनेने भाजपाऐवजी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा मिळविण्यासाठी “सेटींग’ केली होती. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी तशी दोन्ही कॉंग्रेसशी बोलणीही केली होती. मात्र, ही सेटींग फसली आणि “घड्याळा’चे “कमळा’बरोबर सुत जुळल्याने तेथे भाजपाचा महापौर विजयी होऊन सत्ता स्थापन झाली.

अहमदनगर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू होते, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंगळवारी येथे केला. या आघाडीसाठी आपण स्वत: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली होती, असा दावाही कदम यांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अहमदनगरमध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने महापौरपद मिळविले. नगरमधील भाजप-राष्ट्रवादीच्या अभद्र युतीमुळे दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेला धक्का बसला आहे. भाजपला समर्थन देण्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयाबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय राष्ट्रवादीने आपल्या सर्व नगरसेवकांना “कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तसेच महापौर पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आम्ही पाठिंबा मागितला नव्हता, तर राष्ट्रवादीने स्वत:हून आम्हाला पाठिंबा दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले होते.

अहमदनगरमध्ये सर्वाधिक 24 जागा जिंकत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला मात्र सत्तेपासून वंचित रहावे लागले. महापालिकेत 14 जागा जिंकणाऱ्या भाजपने राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची मदत घेऊन सत्ता मिळविल्याने शिवसेना संतप्त आहे.

यापार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना रामदास कदम यांनी नगरमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू होती, अशी खळबळजनक माहिती दिली. अहमदनगर निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष भाजपसोबतच असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. राष्ट्रवादीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीकाही कदम यांनी केली. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल बाहेर येण्याआधीच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देऊ केला होता. त्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, तर राष्ट्रवादी आमची जागा घेईल, असेही त्यांनी सांगितले.

भाजपसोबतचा संसार नीट चालतो का ते बघा
राष्ट्रवादीवर टीका करण्याआधी शिवसेना नेता रामदास कदम यांनी आधी भाजपसोबतचा संसार नीट चालतो की नाही ते आधी बघावे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. कदम यांनी नगरमधील आघाडीबाबत केलेल्या दाव्याच्या संदर्भात बोलताना मलिक म्हणाले, शिवसेनेने भाजपसोबत मांडलेला संसार धड चालत नाही. नगरमध्ये ज्यांनी पक्षादेश पावला नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईलच. परंतु, आधी शिवसेनेने भाजपसोबतचा संसार नीट चालणार की घटस्फोट देणार यांचे उत्तर जनतेला द्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)