शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे भोसलेंचा अखेरचा जय महाराष्ट्र

जामखेड: ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुका शिवसेना प्रमुख शहाजीराजे भोसले यांनी काही पदाधिकाऱ्यांसह जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या गटबाजीला कंटाळून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना फॅक्‍स करून पाठवले आहेत. सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर जामखेडमधील कॉंग्रेस पाठोपाठ शिवसेनेला खिंडार पडले आहे. शहाजीराजे भोसले यांनी राजीनामास्त्र उपसल्याने जामखेड शिवसेनेला खिंडार पडले असून, याचा मोठा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर होणार असल्याने महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे भोसले शिवसेनेत गेली 20 वर्षांपासून एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम केले. एक वर्षांपूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. वर्षभरात पक्षाचे काम जोमाने वाढवून पक्षाला बळकटी दिली. शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय पाटील यांनी सातत्याने अर्थिक त्रास दिला, तसेच तालुक्‍यात गटबाजीचे दर्शन घडवले. यापूर्वी विजय पाटील यांच्यावर अर्थिक देवाणघेवाणचे आरोप झाले होते. मात्र पक्षाने त्याकडे दुर्लक्ष करून पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. मागील तीन महिन्यापूर्वी जिल्हाप्रमुख म्हणून राजेंद्र दळवी यांच्याकडे पाथर्डी -शेवगाव, कर्जत-जामखेड व राहुरी या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी सातत्याने आम्हाला सापत्नभावाची वागणूक दिली. एका गटाला हाताशी धरून सातत्याने गटबाजी केली. तालुक्‍यात येऊन तालुका प्रमुखाला न विचारता इतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्‍यातील आंदोलनाबाबत निवेदन देताना, तालुकाप्रमुख व पदाधिकाऱ्यांचे नाव वगळले जात असे. दळवी यांनी पक्षवाढ न करता गटबाजी केली. पैशाची मागणी पूर्ण न केल्यास तालुकाप्रमुख ठेवले जाणार नाही, असेही सांगितले जात असे.

शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील व जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या त्रासाला कंटाळून तालुकाप्रमुख शहाजीराजे भोसले, तालुका संघटक राहूल उगले, तालुका उपप्रमुख संतोष पाटील, राजु पाचारे, गोकुळ आमटे, जवळा जिल्हा परिषद गट विभागप्रमुख शैलेंद्र वारे, खर्डा विभागप्रमुख भागीनाथ उगले, नायगाव विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक लेंडे, बावीचे दादासाहेब पवार, जवळा गणप्रमुख राजु वाळुंजकर, युवासेना पदाधिकारी हर्षद मुळे या सर्वांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना फॅक्‍सद्वारे पाठवले आहेत.

शिवसेनेचे जामखेड तालुकाप्रमुख शहाजीराजे भोसले म्हणाले, शिवसेनेत गेल्या वीस वर्षांपासून कोणत्याही पदाची लालसा न ठेवता एकनिष्ठेने काम केले. एक वर्षांपूर्वी पक्षाने शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. मात्र शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय पाटील यांनी सातत्याने अर्थिक त्रास दिला. तालुक्‍यात गटबाजीचे दर्शन घडवले. मागील तीन महिन्यापूर्वी जिल्हाप्रमुख म्हणून राजेंद्र दळवी यांच्याकडे पाथर्डी-शेवगाव, कर्जत-जामखेड व राहुरी या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी सातत्याने सापत्न वागणूक दिली. तालुक्‍यात येऊन तालुका प्रमुखाला न विचारता इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तालुक्‍यातील आंदोलनाबाबत निवेदन देताना माझे व इतर पदाधिकारी यांची नावे वगळले जात असे. मी व इतर पदाधिकारी पक्षातून कसे बाहेर पडतील या दृष्टीने राजेंद्र दळवी व डॉ. विजय पाटील यांनी केले. पैशाची मागणी पूर्ण न केल्यास तालुकाप्रमुखपदी ठेवले जाणार नाही, असे वारंवार सांगितले जात असे, असा गंभीर आरोप शहाजीराजे भोसले यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शहाजी राजे भोसले यांच्या राजीनामा नाट्यबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)