खासदार बारणेंना शिवसेनेतूनच विरोध…?

उद्धव ठाकरेंना पत्र : आदित्य ठाकरेंना मावळातून उमेदवारीची मागणी

पिंपरी – मावळची जागा भाजपला सोडण्याची मागणी करत भाजपकडून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला आडकाठी आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता त्यांना स्वपक्षीयांचा विरोध सुरू झाला आहे. मावळ पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमधूनही त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर आळवला जात आहे. बारणेंऐवजी आदित्य ठाकरे यांना मावळमधून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रणित शिवशाही व्यापारी संघाने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.

विद्यमान खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांनाच शिवसेनेकडून मावळमधून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. त्यांना पक्षाकडून कामाला लागण्याचे आदेश देखील आले आहेत. मात्र, मावळची जागा भाजपला सोडण्याची मागणी पिंपरी-चिंचवड भाजपकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण यावर युतीचा उमेदवार ठरविण्याचा सावध पावित्रा वरिष्ठ नेत्यांनी घेतला होता.

राष्ट्रवादीकडून काल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले पत्ते ओपन केल्याने युतीकडूनही उमेदवार जाहीर करण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व खासदार बारणे यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. त्यातच शहर भाजपकडून बारणेंना विरोध सुरू होत असल्याने युतीचा धर्म धोक्‍यात येण्याची भीती वरिष्ठ नेत्यांना सतावत आहे.

“खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्यास मावळची जागा शिवसेनेच्या हातून निसटेल. मी माझे मत पक्ष प्रमुखांकडे पोहचविले आहे. शेवटी उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो शिरसावंद्य असेल. त्यांनी बारणेंनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला तर आदेश आपण निश्‍चितपणे पाळणार आहोत.
– युवराज दाखले, प्रदेश अध्यक्ष, शिवशाही व्यापारी संघ.

दरम्यान, शिवसेनेतूनही बारणेंना विरोध सुरू झाला आहे. मावळ शिवसेनेकडून बारणेंना उमेदवारी न देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर शिवसेना प्रणित शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा जुनै शिवसैनिक युवराज दाखले यांनी उद्धव ठाकरे यांना निवेदन देत उमेदवार बदलाची मागणी केली आहे.

कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करून खासदार झाल्यानंतर बारणे यांनी मावळ व पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसैनिकांवरच सूड उगवले आहेत. त्यांनी पदाचा वेळोवेळी गैरवापर करत पक्षाला चुकीची माहिती देऊन कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील आयारामांना विविध शासकीय पदे दिल्याचा आरोप केला आहे.

दगाफटका करणाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना चालवत आहेत. बारणे यांचा शिवसैनिकांकडून प्रत्येक ठिकाणी सत्कार व सन्मान करण्यात आला. परंतु, त्यांनी सच्च्या शिवसैनिकांना सोडून कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मोठे करण्याचे काम केले. त्यांच्या मनमानी कारभारामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत 14 वरुन नगरसेवकांची संख्या 9 वर आली आहे. नगरसेवकांची वाढ होण्याऐवजी झालेली घट शिवसेनेसाठी चिंतेची बाब आहे.

पिंपरी-चिंचवड शहर व मावळ शिवसेनेत बारणे यांनी गटातटाचे राजकारण सुरू केले आहे. बारणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यास आपल्या शिवसेना पक्षाला मावळमध्ये दगाफटका होऊन पराभवाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे पार्थ पवार यांच्याविरोधात आदित्य ठाकरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)