मुंबई – जालना लोकसभा मतदारसंघातील युतीचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याचे चित्र आहे. अर्जुन खोतकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांमधील राजकीय वैर भाजप-शिवसेना युतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात मातोश्रीवर आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक पार पडली.
मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकाची जबाबदारी पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर याच्यांवर सोपवण्यात आली आहे. मात्र आजच्या बैठकीत जालन्याच्या जागेवर तोडगा निघाला नसून ही प्राथमिक बैठक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता यासंबंधी अंतिम तोडगा औरंगाबाद येथील उद्याच्या बैठकीत निघेल अस बोललं जात आहे.
दरम्यान, उद्या शिवसेना-भाजप युतीचा दुसरा मेळावा औरंगाबाद येथे पार पडणार आहे. त्याआधी जालन्याच्या उमेदवारीबाबत शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत जालन्याच्या उमेदवारीबाबत अंतिम तोगडा निघेल असा अंदाज वर्तविला जात आहे.