“मातोश्री’ च्या स्वार्थासाठीच शिवसेना-भाजप युती

– नारायण राणेंचा प्रहार

– लोकसभा, विधानसभा स्वतंत्र लढणार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई – शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेचे काय झाले, असा रोखठोक सवाल करीत एका बाजूला सत्ता उपभोगली तर दुसरीकडे एकमेकांवर टीका केली. पण युती होणारच याचे भाकित मी सुरुवातीपासून करत होतो. एकमेकांना लाथाडत असले तरी आज गळ्यात गळे घालून युती केली. पण ही युती जनतेसाठी नसून ‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी आणि बचावासाठी ही युती केली असल्याचा जबरदस्त प्रहार माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला.

युती झाली पण मनं जुळलेली नाही, असे सांगतानाच या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होणार नाही, असा दावा करतानाच लोकसभा, विधानसभा निवडणूकीत आपला पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणाही राणे यांनी केली.
शिवसेना-भाजपाच्या युतीसंदर्भात नारायण राणे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आपल्या नेहमीच्या शैलीत सडेतोड आणि रोखठोक उत्तरे दिली. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यावर जाऊ नका. मागील दोन-चार वर्षांतील त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. त्यांनी दिलेला एकही शब्द पाळलेला नाही. शिवसेना बोलेन तसा वागणारा पक्ष नाही.

नीतिमत्ता नसलेला पक्ष अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना अशी नव्हती, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपा-शिवसेनेची युती ही जनतेसाठी नव्हे तर वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मातोश्रीच्या बचावासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला.

निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव झाल्यानंतर भाजपच्या 25 मतदारसंघात लढण्याची तयारी शिवसेनेने केली होती. शिवसैनिक आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांच्याविरोधात लढायला उभे ठाकले होते. आता तेथे ते भाजपला कसे मतदान करणार? असा सवाल राणे यांनी केला. त्यामुळे ही युती फायद्याची होणार नाही. गेल्या चार-साडेचार वर्षांत शिवसेनेने भाजपावर केलेली टीका त्यांचे नेते, कार्यकर्ते विसरलेले नाहीत. त्यामुळे ही युती नेत्यांच्या समाधानासाठी आहे. ‘तुझं माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’…अशी असून त्यातून काहीही साध्य होणार नाही, असे ते म्हणाले. यंदा लोकसभा निवडणुकीत शिवसेना 10 आणि विधानसभेला 25 जागांपर्यंत सुद्धा पोहचणार नाही, असे भाकितही राणे यांनी वर्तवले.

नाणार रद्द का करत नाही…
नाणार प्रकल्प जबरदस्तीने राबविणार नाही, असे सरकार सांगते, मग तो प्रकल्प रद्द का केला जात नाही, असा सवाल राणे यांनी केला. सत्तेत असून उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी आणि नाणारसाठी काहीच केले नाही, असे सांगत या प्रकल्पासाठी सर्व परवानग्या शिवसेनेच्या उद्योममंत्र्यांनीच दिल्या असल्याचा आरोप करीत शिवसेना जनतेसाठी काहीच करू शकत नाही, असे ते म्हणाले.

स्वबळावर लढणार
भाजपाने मला खासदार केले असले तरी त्यांनी मला दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मी भाजपाचा सदस्य नाही, त्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाची शिवसेनेबरोबर युती झाली असल्याने माझा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहे. मी लोकसभा लढवणार नाही, असे स्पष्ट करतानाच विधानसभा लढवायची की नाही हे लोकसभा निवडणुकीनंतर ठरवणार आहे. पण महाआघाडीत जाण्याचा विचार नाही. आघाडीने पाठिंबा दिला तर मी घेणार असे देखील राणें यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार
गेल्या साडेचार वर्षांत या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार कुठे झाला असेल तर तो मुंबई महानगरपालिकेत असल्याचा आरोप राणे यांनी केला. भ्रष्टाचाराने जमवलेलां पैसा पचवण्यासाठी त्यांना सत्ता हवी असून टक्केवारीमधून पक्ष चालवणारी ही मंडळी आहेत. गेली 25 वर्षे मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे.

गेल्या काही वर्षांत कर 3 ते 4 हजारांनी वाढवला आहे. मुंबईतील आज अनेक हौसिंग प्रकल्प मातोश्री आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या भागीदारीमध्ये सुरु आहेत.शिवसेना आणि भाजपाने अनेक घोषणा केल्या, त्याचे काय झाले, असे प्रश्न उपस्थित करीत महागाई कमी झाली का, 15 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले का? 5 कोटी तरूणांना नोकऱ्या मिळाल्या का? असे एकापेक्षा एक सवाल करीत राणे यांनी शिवसेना व भाजपावर टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)