“जय भवानी जय शिवाजी’च्या गजराने राजधानी दुमदुमली

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

नवी दिल्ली : टाळ-मृदंग, ढोल- ताशे, हलगी, लेझीम, हत्ती- घोडे- उंट, नऊवारीसाडी व फेटेधारी खास मराठी पेहरावातील स्त्रिया, मावळे व त्यांच्या मुखातील”जय भवानी जय शिवाजी’ च्या गर्जनेने राजधानी दिल्लीचा आसमंत दुमदुमून गेला. प्रसंग, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. सदनाच्या सभागृहात खासदार संभाजी छत्रपती यांनी सपत्निक छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन पाळणा केला. यानंतर संभाजी छत्रपती यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले.

महाराष्ट्र सदनातून यावेळी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत हत्तीवर आसनस्थ असलेले छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आकर्षण ठरत होते. महाराजांच्या हत्तीवरील स्वारी समोर घोडयावर स्वार मावळे आणि सांप्रदायिक भजन मंडळीचा सहभाग शोभून दिसत होता. ज्ञानोबा तुकाराम या गजराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातारवण निनादून गेले होते. ढोल-ताशे व झांज पथकात सहभागी झालेल्या मुली व तरूण मुले यांचा उत्साह शोभून दिसत होता.

याच शोभा यात्रेत दोरखंडावर विविध आसनं सादर करणा-या नऊवारीतील मुली आणि मल्लखांबाचे सादरीकरण करणारे मुले, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करणा-या तरूणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिल्लीतील स्थानिक मराठी शाळांचे विद्यार्थीही मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. खास मराठी पेहरावातील या विद्यार्थ्यांनी लेझीमवर सर्वांना ठेका धरायला लावला. महाराष्ट्र सदनापासून निघालेल्या शोभा यात्रेचा समारोप येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रांगणावर झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)