शिवाजीनगर बसस्थानक अतिक्रमणांच्या विळख्यात

– नाना साळुंके

पुणे – अनधिकृत वाहने आणि त्यांच्या एजंटांची नागरिकांवर होणारी दादागिरी, रिक्षाचालकांचा अड्डा आणि अतिक्रमणांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला विळखा या सर्व बाबींमुळे शिवाजीनगर बसस्थानक मृत्युचा सापळाच बनला आहे. अतिक्रमांमुळे रस्त्याचा बहुतांशी भाग व्यापला गेल्याने वाहन चालविण्यासोबतच पायी चालणेही मुश्‍कील झाले आहे. रात्रीच्या वेळी सिमला ऑफिस चौक ते शिवाजीनगर बसस्थानक हे अवघे दोन मिनिटांचे अंतर पार करण्यास तब्बल पंधरा ते वीस मिनिटे लागत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

-Ads-

फूटपाथ बनलेत व्यावसायिकांचा अड्डा…!
बसस्थानकावरून अन्य महत्त्वाच्या शहरात जाणाऱ्या बसेस ये-जा करत असतात. एसटीच्या अथवा पीएमपीएमएलच्या बसेस वळविण्यासाठी मोठी जागा लागत असल्याने हा परिसर अतिक्रमणमुक्त असावा, अशी अपेक्षा या दोन्ही प्रशासनाकडून व्यक्त होत असून संबंधित प्रशासनांशी तसा पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, या आदेशाची आतापर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाही. विशेष म्हणजे बहुतांशी व्यावसायिकांनी फूटपाथवरच त्यांचा व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या कडेनेच चालत जावे लागते. त्यातूनच आतापर्यंत छोटे मोठे अपघात घडले आहेत.

व्यावसायिकांची “दुकानदारी’…!
परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी खासगी बसेसना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. मात्र, या बसेस या परिसरातून गेल्या असल्या तरी त्यांच्या एजटांनी त्यांच्या जागा अद्याप सोडलेल्या नाहीत. त्यांच्याकडून स्टूल आणि टेबल टाकून रस्त्याच्या कडेलाच “दुकानदारी’ सुरू आहे. काही एजटांनी त्यांचे व्यवसाय फूटपाथवरच मांडले आहेत. परंतु हे सर्व दिसत असूनही पोलीस, महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.

एवढा हट्ट कशासाठी…!
सायंकाळी सहानंतर सिमला ऑफिस चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे हे अंतर पार करण्यासाठी वाहनांना किमान पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागत होता. तसेच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही होत होती, त्यावर उपाय म्हणून सायंकाळी सहानंतर शिवाजीनगर बसस्थानकाकडे येण्यासाठी सर्व प्रकारच्या बसेसना बंदी घालण्यात आली होती. त्याबाबत एसटी आणि पीएमपीएमएल प्रशासनाला पत्रही देण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटलाही होता. मात्र, हा फॉर्म्युला फारकाळ टिकला नाही. जुन्याच मार्गावरुन बस नेण्याचा बसचालकांचा हट्ट सुरु झाला आहे, त्यामुळे या परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी सुरु झाली आहे.

अतिक्रमणांचा विळखा…!
अतिक्रमणांमुळे परिसरात छोटे मोठे अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे एसटी बसेस आत जात असलेल्या आणि बाहेर पडत असलेल्या बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच या अतिक्रमणांनी विळखा घातला आहे. त्यामुळे बस वळविताना वाहनचालकांना त्रास होत आहे. त्याबाबत तक्रारी आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. मात्र, हा प्रयोग फारकाळ टिकला नाही. त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. हे वास्तव असतानाही पोलीस अथवा महापालिका प्रशासनाकडून या अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग!
न. ता. वाडी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजूला पार्किंगसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. ही पार्किंग चारचाकी नव्हे तर दुचाकी वाहनांसाठी आहे, हे वास्तव असतानाही दळवी हॉस्पिटलच्या समोरच्या रस्त्यावर टुरिस्ट गाड्या उभ्या केलेल्या असतात. तर, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही हेच वाहनचालक त्यांच्या गाड्या उभ्या करत असतात, त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर कोणत्याही कारवाई होत नाही. त्यामुळे अशी अनधिकृत वाहने उभी करणाऱ्यांना पोलिसांचेच अभय आहे काय असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे.

रिक्षाचालकांची मुजोरी…!
एसटी बसस्थानकाच्या बाहेर रिक्षाचालकांसाठी थांबा देण्यात आला आहे. मात्र, हे रिक्षाचालक एसटी आणि रेल्वे स्थानकाच्या बाहेर आडव्या तिडव्या गाड्या उभ्या करत आहेत. रेल्वे स्थानकाच्या बाहेर तर हे रिक्षाचालक घोळका करून उभे राहत असल्याने प्रवाशांना विशेषत: पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.

रस्त्यावरच रिक्षाचालक आणि अन्य वाहने कशीही उभी करत असल्याने त्याचा पादचाऱ्यांना त्रास होत आहे. तसेच फुटपाथवरच व्यावसायिक व्यवसाय थाटत असल्याने तेथून चालणेही मुश्कील झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असतानाही वाहतूक पोलीस अथवा अन्य प्रशासनांच्या माध्यमातून ती होताना दिसून येत नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या विरोधात एकट्याने नव्हे तर सामुहिक आवाज उठवण्याची आवश्यकता आहे.

– समीर पवार, प्रवासी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)