शिवशाहीची कारला भीषण धडक

कारचा टायर फुटल्याने झाला अपघात
कवठे –
टायर फुटल्याने महामार्गावरच आडवी झालेल्या कारला पाठीमागून आलेल्या शिवशाही बसने धडक देत सुमारे 100 फूट रेटत नेले. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला असून सुदैवाने चालक बचावला आहे. हा अपघात ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर सुरुर गावच्या हद्दीत मंगळवारी घडला.

अधिक माहिती अशी, साताऱ्याहुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या हुंडाई कंपनीच्या एसेंट कारचा सुरुर गावच्या हद्दीत आला असताना चालकाच्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला जाऊन धडकली. मात्र, याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या शिवशाही बसच्या चालकालाही बस नियंत्रित करता न आल्याने चालकाने कारला जोरदार धडक देत कार सुमारे शंभर फूट पुढे रेटत नेली. या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान आले आहे. दरम्यान, शिवशाहीने दिलेल्या धडकेनंतर कारमधील एअरबॅग उघडल्याने कारचा चालक बांदेकार हा या अपघातातून बचावला आहे.

अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळावर गर्दी केली. यावेळी सुरुर गावच्या पोलीस पाटील निर्मला पवार यांनी तात्काळ भुईंज पोलीस ठाण्याशी संपर्क करुन अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून हवालदार कोळी हे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)