तोकड्या शिवसेनेची भिस्त भाजपवर ; दुरावलेले शिवसैनिक वाकचौरेंच्या कळपात

जयंत कुलकर्णी /नगर: दोन तालुक्‍यांत बेरीज नाही. पण वजाबाकी करण्याइतपत ताकद सोडली, तर अन्य तालुक्‍यांत फारसे अस्तित्व नाही, अशी शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची अवस्था आहे. तोकड्या ताकदीवर शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे लोकसभेच्या रिंगणात उतरले असले, तरी त्यांची सारी भिस्त भाजपवर आहे. त्यात लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराज झालेले शिवसैनिक माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कळपात गेले आहेत. त्यामुळे खा. लोखंडे यांचा बहुतांशी वेळ हा रुसवेफुगवे काढण्यात जाण्याची शक्‍यता आहे. अद्यापही भाजपच्या नेत्यासह कार्यकर्ते निवडणूक प्रक्रियेत सक्रिय झाले नाहीत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात खा. लोखंडे अवघ्या 13 दिवसांत खासदार झाले होते. हा अनपेक्षित विजय मिळाल्याने खा. लोखंडे हवेतच गेले होते. अर्थात मोदी लाटेवर लोखंडे खासदार झाले. त्यात कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर विखेंचा हक्‍का बसला होता. विखेंचे उमेदवार असल्याचा फटका देखील त्यावेळी कॉंग्रेसला बसला होता. तसेच लोखंडे विधानसभा मतदारसंघात लुडबुड करणार नाही, हा निकष त्यांच्या विजयासाठी महत्वाचा ठरला. खासदार झाल्यानंतर लोखंडे पहिले दोन वर्षे तर मतदारसंघात फिरकले देखील नाही. त्यानंतर मात्र ते काही कार्यक्रमांच्या निमित्ताने मतदारसंघ जाऊ लागले. शिर्डी हे त्यांचे कार्यस्थळ ठरले. अकोले, शिर्डी व नेवासा या तालुक्‍यांत त्यांनी काय ते दौरे या पाच वर्षांत केले असतील.

कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर या तीन तालुक्‍यांत ते क्‍वचितच फिरकले असतील. त्यामुळे खा. लोखंडे यांचा मतदारसंघात संपर्क कमी राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आज नाराज आहेत. शिवसेनेची फारशी ताकद नसतानाही लोखंडे खासदार झाले. उत्तरेत शिवसेनेची कोपरगाव, अकोले वगळता प्रभावी अशी ताकद नाही. नेवाशात यापूर्वी शिवसेनेची बऱ्यापैकी कार्यकर्त्यांची फौज होती. पण आज तीही राहिलेली नाही. अकोलेमध्ये एक जिल्हा परिषद सदस्य गट सोडला, तर शिवसेनेचे अस्तित्व फारसे दिसत नाही. संगमनेरमध्ये तर नावालाच शिवसेना आहे.

राहाता तालुक्‍यात शिवसेनेची ताकद मोठी होती. परंतु आज त्यापैकी बहुतांशी विखे गट व भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत. कोपरगावमध्ये शिवसेना प्रभावी आहे. पण माजी आमदार अशोक काळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर तेथील शिवसेना देखील खिळखिळी झाली आहे. परंतु कोपरगाव शहराच्या राजकारणात खारीचा वाटा उचणारे शिवसैनिक असल्याने त्यांची प्रत्येक राजकीय पक्षांना दखल द्यावी लागत आहे. तरी स्थिती अकोलेमध्ये आहे. याचा अर्थात शिवसेनेची ताकद कॉंग्रेस व भाजपपेक्षा फारस तोकडी आहे. त्यामुळे खा. लोखंडे यांची भिस्त भाजपवर आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोपरगाव व नेवासे या दोन विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. संगमनेर, श्रीरामपूर व राहाता या तीन मतदारसंघांत कॉंग्रेसचे, तर अकोलेत राष्ट्रवादीचा आमदार आहे. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला, तर अकोले पंचायत समिती राष्ट्रवादीच्या पाठिंबावर शिवसेनेकडे असून, अन्य एकही संस्था शिवसेनेकडे नाही. ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर शिवसेनेची शिर्डी लोकसभा मतदारसंघात ताकद अतियश कमी आहे. एवढ्या ताकदीवर खा. लोखंडे निवडणुकीला समोर जात आहेत.

भाजपचे दोन आमदार असून, ते अद्यापही सक्रिय झालेले नाहीत. भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांनी तर शिवसेनेचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे खा. लोखंडे यांना भाजपच्या नेत्यांची नाराजी दूर करावी लागणार असून, त्यात बहुतांशी वेळ खर्च होण्याची शक्‍यता आहे. भाजपच्या नेत्यांवर त्यांची मदार असल्याने त्यांना या नेत्यांची जुळवाजुळव करणे आवश्‍यक आहे. तोकडी ताकद असतांनाही गेल्यावेळी केवळ मोदी लाटेवर स्वार होऊन लोखंडे खासदार झाले. मात्र यावेळी खऱ्या अर्थाने खा. लोखंडे यांची परीक्षा आहे.

यंदा विखे लाट तारणार का?

भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना दक्षिणेत शिवसेनेची गरज आहे. नगर शहर व पारनेरमध्ये शिवसेनेचे ताकद मोठी असल्याने शिवसेना त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी भाजप प्रवेशानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी खा. लोखंडे देखील त्यांच्याबरोबर होते. या भेटीत डॉ. विखे यांनी शिर्डी मतदारसंघात खा. लोखंडे यांना मदत करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच नगर दक्षिणचे 23 एप्रिलला मतदान झाल्यानंतर पुढे शिर्डीसाठी सात दिवस प्रचाराला मिळणार असल्याने त्या सात दिवसांत डॉ. विखे लोखंडे याचा प्रचार करणार असल्याचे सांगण्यात येत. त्यामुळे यंदा खा. लोखंडे यांना विखे लाट तारणार का? याबाबत उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)