विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेची वर्णी?

विजय औटींच्या नावाची चर्चा : 30 नोव्हेंबर रोजी होणार निवडणूक

मुंबई: सत्तेत राहून भाजपाला विरोध करणाऱ्या आणि आगामी निवडणूका स्वबळावर घोषणा करणाऱ्या शिवसेनेची भाजपाने मनधरणी सुरु केली आहे. गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेले विधानसभा उपाध्यक्षपद शेवटच्या काही माहिन्यांसाठी का होईना शिवसेनेला देण्याची तयारी भाजपाने दाखवली आहे. आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी उपाध्यक्षपदाची निवडणूक घोषित केली. 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा आहे.

विधान परिषद उपसभापतीपदी निलम गोऱ्हे?
विधानपरिषदेचे उपसभापती कॉंग्रसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर उपासभतीपद रिक्त आहे. या रिक्त पदासाठीही उद्या निवडणूक घोषित होण्याची शक्‍यता आहे. या पदावर शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांची निवड होण्याची शक्‍यता आहे. गोऱ्हे यांच्यासह सेनेचे गोपीकिसन बजोरीया यांचे नाव देखील चर्चेत आहे. परंतु, ही निवडणूकसुद्धा बिनविरोध करण्याकडे सत्ताधाऱ्याचा प्रयत्न राहणार आहे. विधानपरिषदेत सध्या भाजप 22, शिवसेना 12, कॉंग्रेस 17, राष्ट्रवादी कॉंग्रेस 17, शेकाप 2, लोकभारती 1, असे पक्षिय बलाबल आहे.

गेल्या चार वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत शिवसेना सरकारमध्ये सामील आहे. मात्र शिवसेनेने सत्तेत राहून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. अशातच अलिकडेच शिवसेनेने महामंडळावर वर्णी लावून घेतली आहे. असे असतानाच मंगळवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीत विधानसभेचे उपाध्यक्ष व विधानपरिषदेचे उपसभातीपद शिवसेनेला देण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. भाजप-शिवसेना सरकारचा जेमतेम एक वर्षाचा कार्यकाळ उरला असताना आज विधानसभा अध्यक्षांनी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीसाठीची नामनिर्देशनपत्रे गुरुवार, 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.45 वाजेपर्यंत विधानमंडळाचे प्रधान सचिव यांच्या दालनात सादर करावयाची आहेत.

नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रधान सचिव यांच्या दालनात गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत होईल. त्यानुसार उमेदवारी माघारी घ्यावयाची असल्यास त्याबाबतची लेखी सूचना प्रधान सचिवांकडे शुक्रवार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत स्वत: उमेदवाराने किंवा त्याच्या अनुमोदकाने आणून देणे आवश्‍यक आहे. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 ते 1 वाजेदरम्यान मतदान घेतले जाईल, अशी माहिती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली.

विधानसभेत विरोधकांच्या तुलनेत भाजपाचे 123 आणि शिवसेनेचे 63 आमदारांचे संख्याबळ आहे. विरोधकांपेक्षा तगडे संख्याबळ असल्याने ही निवड बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे. सेनेतर्फे विजय औटी यांचे नाव आघाडीवर असले तरीही संजय शिरसाठ, सुभाष साबणे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते, अशी शिवसेनेमध्ये चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
27 :thumbsup:
21 :heart:
210 :joy:
1 :heart_eyes:
102 :blush:
2 :cry:
185 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)