शिवसेनेच्या आमदारावर मानखुर्द मध्ये खुनी हल्ला 

मुंबई – शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर काल रात्री एका गटाने मानखुर्द येथे हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला पण या हल्ल्यातून ते सुखरूप बचावले आहेत. तथापी त्यांचा एक समर्थक मात्र हा हल्ला निभावताना जखमी झाला आहे. या संबंधात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की नवरात्रीच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहून आमदार काते हे आपले अंगरक्षक आणि समर्थकांसह घरी परत येत असताना हा हल्ला झाला.

अंगरक्षक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांपासून आमदारांचे संरक्षण केले. त्यावेळी जखमी झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्‍याच्या बाहेर आहे असे रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. या प्रकारानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. त्यांच्या शोधासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत. ज्या सहा जणांनी हा हल्ला केला त्यांची ओळख पटली असून त्यांनी हल्ल्याच्यावेळी वापरलेली तलवारही जप्त करण्यात आली आहे.
व्यक्तीगत वैमनस्यातून हा हल्ला झाला असे सांगण्यात येते. त्यांच्या मतदार संघात मेट्रोचे काम सुरू आहे. रात्री-अपरात्री हे काम सुरू असते ते थांबवण्यात यावे यासाठी आमदार काते आग्रही होते त्यामुळे मेट्रोच्या कंत्राटदाराकडूनच हा हल्ला झाला असल्याचे या आमदारांनी म्हटल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने या प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यात गॅंगवार सुरू आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवरच त्यातून हे हल्ले होत आहेत. गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असून सुद्धा त्यांना हे प्रकार थांबवण्यात अपयश आले आहे असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ठेकेदारी आणि अंतर्गत राजकारणातूनच हा हल्ला झाला असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)