शिवछत्रपती : एक कुशल प्रशासक, सहिष्णू राजा

– साईप्रसाद कुंभकर्ण

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं राज्य हे सर्वसामान्य लोकांचं होतं. या राज्यात कोणालाही हीन वागणूक दिली जात नव्हती. शिवराय हे महाप्रतापी तर होते, पण त्याचसोबत ते उत्तम प्रशासकही होते. शिवाजी महाराजांच्या रयतेमध्ये सगळ्याच धर्माचे व सर्व जातीचे लोक होते. पण त्यांनी कधीही लोकांमध्ये धर्मावरून मतभेद केले नाहीत. त्यांनी नेहमीच साऱ्याच धर्मांना समान वागणूक दिली. जर एखादी कुराणाची प्रत त्यांच्या हाती लागली तर ते त्याबद्दल पूज्यभाव दाखवून ती आपल्या मुसलमान नोकरांच्या, सरदारांच्या स्वाधीन करत असत. तसंच ते प्रत्येक स्त्रीला मातेसमान मानून तिचं रक्षण करत असत. आपल्या मावळ्यांना देखील स्त्रियांशी सभ्यतेने वागावं असा त्यांचा आदेश होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

छ. शिवरायांचं धर्माविषयाचं सहिष्णू धोरण एका मुस्लीम इतिहासकाराने नोंदवून ठेवलेलं आहे. शिवाजीराजे स्वतः हिंदू होते आणि धर्मश्रद्ध होते. परंतु राजा म्हणून त्यांनी धर्मावरून कधीही प्रजेत भेद केला नाही. हिंदुूना एक वागणूक आणि दुसऱ्या जातीस हीन वागणूक असं त्यांनी कधीच केलं नाही. रयतेला त्यांचा धर्म, त्यांचे रीतीरिवाज पाळण्याची मुभा त्यांनी दिली होती. खरं तर शिवरायांचा काळ लक्षात घेता शिवरायांचं हे धोरण आणि त्यांचे विचार अनन्यसाधारण असेच होते. कारण त्यावेळच्या लोकांवर धर्माचा मोठा पगडा होता. पण आपल्या धर्माइतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ आणि उच्च असतो अशीच त्यांची शिकवण असे.

शत्रू आक्रमण करून मोठ्या प्रमाणावर रयतेच्या शेतीचं, धान्याचं नुकसान करत असत. त्यामुळे शत्रूच्या आक्रमणापासून शेतकऱ्यांचं आणि शेतीचं संरक्षण करणं हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासनाचं एक प्रमुख सूत्र होतं. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, दिल्लीची मोगलशाही, सिद्दी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज अशा अनेक शत्रूंशी संघर्ष करत शिवाजी महाराज आपलं स्वराज्य उभारत होते. अशा परिस्थितीत शत्रूंच्या वारंवार स्वाऱ्या होत असत. अशा स्वाऱ्यांमध्ये सर्वांत जास्त संकट रयतेवर आणि रयतेच्या पिकावर कोसळत असे. भरलेल्या पिकामध्ये घोडदळ सोडून पीक उद्‌ध्वस्त केलं जात असे. तसेच भरदिवसा गावंच्यागावं लुटली जात असत. लहानथोरांना क्रूरपणे ठार केलं जात असे. बालक आणि महिलांवर अत्याचार केले जात असे. या साऱ्यांच्याविरोधात शिवाजी महाराजांनी नेहमीच लढा दिला. प्रत्येक संकटामधून शिवरायांनी रयतेला नेहमीच बाहेर काढलं आणि या क्रूर लोकांपासून संरक्षण दिलं. रयतेला खरं कल्याणकारी नेतृत्व शिवरायांच्या रूपाने मिळाले.

3 वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. जर शिवकालीन उपाय आजच्या दुष्काळावर अंमलात आणले तर नक्कीच दुष्काळाची भीषणता कमी झाली असती. शिवकाळात अनेकवेळा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पण जलसंधारणाचं आणि पाण्याच्या वापराचं महत्त्व महाराजांनी ओळखलं होतं. शेतीचं दुष्काळामुळे होणारं नुकसान कसं टाळता येईल यासंबंधी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. शेतीला उपलब्ध असलेलं पाणी आणि जमिनीची प्रतवारी करण्याचे प्रयत्न शिवरायांनी केले होते. गड किल्ल्यांसाठी पाणीसाठे निर्माण करण्याचं आणि त्याचा वापर करण्याचं तंत्र त्यांना अवगत होतं.

शिवरायांनी महाराष्ट्रात गडांचं, किल्ल्यांचं महत्त्व ओळखून महाराष्ट्रात अनेक गडकोटांची निर्मिती केली. जलदुर्ग बांधून स्वराज्याचं आरमार निर्माण केलं. पण आज शिवाजी महाराजांच्या अनेक किल्लंची दुर्दशा झाली आहे. अनेक गड तर शेवटची घटका मोजत आहे. किल्ल्यांवर अनेक ठिकाणी घाण केली जाते. खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या तिथे टाकल्या जातात किंवा अयोग्य वर्तन केलं जातं. हे सारं चुकीचं आहे. काही लोक तर गडांवर जाऊन दारू पिणं, धिंगाणा घालणं यासारखेही प्रताप करतात.

शिवरायांच्या या ऐतिहासिक वास्तूंचा अपमान होणार नाही, या वास्तूंचं पावित्र्य राखलं जाईल याची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)