शिरुरमध्ये सेना-भाजपचं सशर्त जमलं!

आढळरावांची सपशेल माघार : उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर पुढील भवितव्य
भोसरी – शिरुर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात भाजपने शिवसेना उमेदवाराच काम करण्याचा निर्णय घेतला असला तरी तो सशर्त आहे. उद्धव ठाकरे यांनी भोसरीचा मतदारसंघ विधानसभेसाठी सोडला तरच काम केलं जाणार आहे. शिवाय गेल्या साडेचार वर्षांत खासदार शिवाजीराव आढळरावांनी विकास कामांबाबत दिलेली पत्रे मागे घेण्याची अट ठेवण्यात आली आहे. आढळरावांनी अनावधानाने पत्रे दिल्याचे सांगत सपशेल माघार घेतली असली तरी उद्धव ठाकरे यांनी भोसरीबाबत घोषणा केल्यावरच भाजपाकडून या मतदारसंघात प्रचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचे काम करण्यास भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनीही आढळरावांचा प्रचार नाहीच..! अशी भूमिका घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून युतीमधील दुही चव्हाट्यावर आली होती. मनोमिलनासाठी बैठकांची सत्रे पार पडली. मात्र त्यातून काहीच साध्य झाल नाही. भाजपकडून या मतदार संघावर दावा करण्यात आला होता. मात्र युतीच्या वाटपात हा मतदार संघ शिवसेनेकडे कायम राहिला. शिवसेनेकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतरही भाजप पदाधिकारी व आमदारांनी प्रचारात सहभाग नोंदविला नव्हता.

या पार्श्‍वभूमीवर आज (शुक्रवारी) खासदार शिवाजीराव आढळराव आणि महेश लांडगे यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह बाळासाहेब गव्हाणे, सारंग कामतेकर, विजय फुगे आदी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र गेल्या साडेचार वर्षांत आढळराव यांनी भोसरीतील विकास कामांबाबत केलेले आरोप, विविध प्रशासकीय पातळीवर दिलेली पत्रे, वेस्ट टू एनर्जी, रस्ते विकास या कामांबाबत आक्षेप घेतले होते. हे सर्व आरोप व पत्रे तात्काळ माघारी घेण्याची मागणी उपस्थित भाजप नेत्यांनी केली.

यावर आढळराव यांनी ही पत्रे मागे घेणार असल्याचे सांगत अक्षरश: भाजपपुढे मदतीसाठी सपशेल माघार घेतली. अनावधानाने पत्रे दिल्याचे त्यांनी जाहीर करत माघार घेण्याचे आश्‍वासन दिले. तसेच युतीच्या जागा वाटपातील भोसरीचा मतदार संघ शिवसेनेने सोडून तो भाजपला द्यावा, अशी मागणी केली. याबाबत दोन दिवसांत शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांना भेटणार असून ठाकरे यांनी हा मतदार संघ सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजप नेते आढळरावांचा प्रचार करणार आहेत. अटी व शर्तींवर आज झालेले मनोमिलन खरेच मतदानापर्यंत टिकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आढळरावांच्या विश्‍वासार्हतेला तडा?
गेल्या साडेचार वर्षांत खासदार या नात्याने शिवाजीराव आढळराव यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघासह शहरात झालेल्या गैरकारभारांवर टीकेची झोड उठविली होती. आढळराव यांनी त्या-त्यावेळी उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चाही घडून आली होती. आज अचानक या सर्वच मुद्यांवर आढळरावंनी “यु टर्न’ घेतल्यामुळे त्यांच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)