कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची खुलेआम लूट

शिर्डीतील प्रदर्शनातील चित्र : प्रवेशासाठी प्रतिव्यक्‍ती 20 रुपये तिकिट आकारणी

शिर्डी – शिर्डी येथे दि.16 ते 24 ऑगस्टपर्यंत भरविण्यात आलेल्या साईबाबा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून तिकीट दर आकारला जात आहे. यातून आयोजक कोट्यवधी रुपयांची कमाई करीत असल्याचा आरोप संतप्त शेतकरी करीत आहेत.

साईबाबा समाधी सोहळ्यानिमित्त शिर्डी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जागतिक नोंद झालेल्या गंगागिरी महाराज यांच्या 171 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या निमित्त दि.16 ते 24 ऑगस्ट या कालावधीत सांगली येथील एका खासगी कंपनीच्या वतीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनास जिल्ह्यासह राज्यभरातून लाखोंच्या संख्येने शेतकरी भेट देत आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवेश करतानाच प्रतिव्यक्‍ती 20 रुपये तिकिट आकारणी केली जात आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्‍त केला.

यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. विदर्भ, मराठवाडा येथील शेतकरी चिंताग्रस्त आहे, तर शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, बियाणे, रासायनिक खते, सेंद्रिय खते, तसेच शेतीविषयक अन्य माहिती मिळावी, यासाठी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आम्ही विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघात आलो असल्याचा निर्वाळा दिला. मात्र असे असताना आमच्याच खिशाला कात्री लावण्याचा उद्योग खुलेआम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली खिसे भरण्याचे काम नकळतपणे चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी प्रदर्शनात छोटे-मोठे असे तब्बल 200 स्टॉल लावण्यात आले आहेत. साधारणतः दहा टक्के स्टॉल शासकीय योजनासाठी मोफत दिले आहेत. उर्वरित स्टॉलधारकांकडून कमीतकमी 30 हजार आणि जास्तीत जास्त 50 हजार रुपये भाडे आकारण्यात आल्याचे स्मार्ट एक्‍स्पोचे संचालक सोमनाथ थेटे यांनी सांगितले.

शेती महामंडळाची 65 एकर जागा, उर्वरित 35 एकर जागा खासगी, अशी एकूण 100 एकर जागा विना मोबदला सप्ताहनिमित्तच्या कार्यक्रमांना वापरण्यास दिल्याचे समजते. कृषी प्रदर्शन सप्ताहस्थळीच आहे. त्यामुळे सप्ताहाचा लाभ घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने येणारे भाविक येथे येतात. त्याचा फायदा कृषी प्रदर्शनास होत असल्याचे चित्र पहायला मिळाले.

यापूर्वीच्या सप्ताहातही तिकिट आकारणी…

याबाबत “स्मार्ट एक्‍स्पो’चे संचालक सोमनाथ थेटे म्हणाले की, इतके मोठे प्रदर्शन भरविण्यासाठी राज्य शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. कृषी प्रदर्शन भरविणे परवडत नसल्याने पर्याय म्हणून आम्ही तिकीट दर आकारतो. या मागील भेंडा, लासूर स्टेशन येथे झालेल्या गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात तिकीट दर आकारण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. या सप्ताहासाठी आमच्या कंपनीने 15 लाख 11 हजार रुपये वर्गणी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

तिकिट आकारणी चुकीचीच : लोणारे

शिर्डीतील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक प्रकारची पर्वणी ठरेल. प्रदर्शन पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे दर आकारणे चुकीचे आहे. शेतकरी बांधवांकडून संबंधित कंपनीने तिकीट दर आकारून पैसे घ्यायला नकोत, असे स्पष्टोक्‍ती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)