जिल्ह्यातील शिवसेनेत उपरेच शिरजोर

निवडणुकांनंतर उपरे पक्षात राहणार की जाणार? : शिवसैनिकांमध्ये संभ्रम
प्रकाश राजेघाटगे

सातारा – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानून सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी व रुजवण्यासाठी अनेक शिवसैनिकांची हयात खर्च झाली आहे. परंतु, सध्या जिल्ह्यात केवळ निवडणुकीसाठी पक्षात आलेले उपरेच शिरजोर झाल्याचे चित्र आहे. यामुळे मूळचे कट्टर शिवसैनिकही संभ्रमात असून निवडणुकीनंतर उपरे पुन्हा पक्ष सोडून गेले तर पक्षाची अवस्था बिकट होण्याची शक्‍यता आहे.

शिवसेनेसाठी साताऱ्यात 1995 ची विधानसभा निवडणूक महत्त्वपूर्ण निवडणूक ठरली. सेनेने यावेळी निष्ठावंताची फौजच उमेदवार म्हणून मैदानात उतरवली. जावळीमधून सदाशिव सपकाळ, सातारमधून कै. हणमंतराव यादव, खटावमधून भानुदास कोरडे, कोरेगांवमधून श्रीकांत पंडीत, कराड दक्षिणमधून चंद्रकांत पवार व वाईमधून ऍड. प्रमोद थिटे असे कट्टर शिवसैनिक उमेदवार म्हणून निवडले. जावळीतून सदाशिव सपकाळांनी भगवा फडकवला तर सातारा व खटावमध्येही चांगले मतदान झाले. पुढे 1996 मध्ये लोकसभेत हिंदुराव नाईक-निंबाळकरांनी आश्‍चर्याचा धक्का देत मातब्बर प्रतापराव भोसले यांचा पराभव केला.

पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांना सातारा जिल्ह्याने चांगली साथ दिली. सेनेची ताकद 2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर क्षीण होत गेली. याच दरम्यान हिंदुराव नाईक-निंबाळकर, वसंतराव मानकुमरे, सदाशिव सपकाळ, भास्करराव गुंडगे यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला. याला अपवाद होता. तो नरेंद्र पाटील यांचा. पाटण वगळता शिवसेना संघटन खिळखिळे होत गेले. तथापि, 2005 नंतरही खुप कट्टर लोक शिवसेनेत होते. पण निवडणुकीच्या राजकारणात उपऱ्यांचा वावर वाढला. 2009 च्या लोकसभेअगोदर पुरुषोत्तम जाधवांना सेनेत घेऊन तिकीट दिले. विधानसभेलाही तीच गत होती. कराड उत्तर मधून वासुदेव माने, कोरेगांव संतोष जाधव अशा नव्याने आलेल्यांना संधी दिली गेली. संघटनेत दीपक पवार, बाळासाहेब बाबर असे उपरेच शिरजोर झाले. त्यामुळे कट्टर शिवसैनिक फक्त आंदोलन आणि मतदानापुरता मर्यादित राहिला. 2014 लाही याच स्थितीत काहीच फरक पडला नाही.

2014 च्या निवडणुकीनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता केंद्रात व राज्यात संपुष्टात आली. सेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. संपर्कप्रमुखही जिल्ह्यातील लाभले. या चार वर्षात सेनेचे संघटनात्मक ताकदही वाढली. पण आता 2019 च्या लोकसभेला ताकदीने सामोरी जाणारी शिवसेना परत एकदा नवागतांवर का अवलंबून आहे, अशी शंका आता येत आहे. 2014 च्या निवडणुकीत महायुतीची सातारची जागा रिपब्लिकन पक्षाला गेल्यामुळे नाराज झालेले पुरुषोत्तम जाधव भाजपावासी झाले. गेल्या चार वर्षात त्यांनी कायम लढण्याच्या भूमिकेत आहोत हे जनतेला दाखवून दिले. आताही सेना-भाजपा स्वतंत्र लढणार असते तर तेच भाजपाचे उमेदवार असते. पण युती झाल्याने व सातारा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्याने पुन्हा नाईलाजास्तव स्वगृही यावे लागले.

सेनेत कट्टर शिवसैनिक असताना उपरे उमेदवार कशासाठी हा प्रश्‍न सामान्य शिवसैनिकांना पडत आहे. प्रतिकूल परिस्थितीत जावळी तालुक्‍यातून एस. एस. पार्टे गुरुजींनी सेनेची संघटना बांधून ठेवली. याचाच परिणाम गत नगरपालिका निवडणुकीत सेनेचे दोन नगरसेवक व मेढा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद सेनेच्या वाट्याला आले. काही दिवसांपुर्वी झालेल्या मेळाव्यात कट्टर शिवसैनिकांना उमेदवारी मिळावी, यासाठी जुन्या-जाणत्या शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. पण आता पक्षश्रेष्ठी यावर कशी साद देतात यावरच सामान्य शिवसैनिक आस लावून बसला आहे. विधानसभा निवडणूक पक्षासाठी महत्वाची असताना निष्ठांवतांना संधी दिली गेली तरच जिल्ह्याच्या राजकारणात काही बदल होवू शकतो, नाहीतर विधानसभेनंतर परत एकदा उपरे पळून गेले तर पक्षाची बिकट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)