श्रीगोंदा पोलिसांकडून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

 साडेचार लाख रुपये किमतीच्या 17 दुचाकी जप्त; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

बनावट चावी अन्‌ गाडी लंपास
पवार याच्याकडे दोन तीन बनावट चाव्या होत्या. त्याच्या सहाय्याने तो अगदी सहज दुचाकी चोरायचा. दुचाकी चोरांची मोठी टोळी पकडल्यामुळे श्रीगोंदा, कर्जत, शिरूर तालुक्‍यातील दुचाकी चोरीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. चेसी क्रमांकाच्या आधारे पोलीस मूळ दुचाकी मालकांचा शोध घेत आहेत. दुचाकी चोर पकडल्यामुळे सर्वच स्तरातून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विना क्रमांकाच्या गाडीवरून सापडला म्होरक्‍या
श्रीगोंदा पोलिसांना श्रीगोंदा शहरात एक मुलगा बिगर क्रमांकाच्या दुचाकी वारंवार फिरवत असून तो मौजमजा करत असल्याची गुप्त माहिती समजली होती. त्यानुसार याचा तपास पथकाने संशयित तुषार पवार या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्या सहा साथीदारांसह श्रीगोंदा व शिरूर तालुक्‍यातून दुचाकी चोरून त्या नगर जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यात विकत असल्याचे त्याने कबुली दिली.

श्रीगोंदा – पोलिसांनी दुचाकी चोरी करून त्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद केली असून या टोळीकडून श्रीगोंदा पोलिसांनी आतापर्यंत साडेचार लाख रुपये किमतीच्या 17 दुचाकी जप्त केल्या आहेत.
या टोळीचा म्होरक्‍या तुषार रखमाजी पवार (वय 22, रा. देऊळगावग लांडे, ता. श्रीगोंदा) याच्यासह त्याला या दुचाकी चोरी विक्रीत मदत करणारे महेश भाऊसाहेब कदम (वय 22), राहुल सुरेश कदम (वय 23,दोन्ही रा.बारडगाव दगडी,ता.कर्जत) महेश उत्तरेशवर गायकवाड (वय 24 रा. शेवरे ता. माढा, जि. सोलापूर), सागर बाळासाहेब डांगे (वय 20 रा. वडाळी, ता. श्रीगोंदा), विक्रम आप्पासाहेब जगताप (वय 22, रा. शिंदा ता. कर्जत), अभिषेक हनुमंत मिसाळ (वय 19 रा. सोनार अळी ता. शिरूर) या सात जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चोरांचा भांडाफोड कर्जत पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर, पो. हे. कॉं. अंकुश ढवळे, पो कॉ किरण बोराडे, पो. कॉं. दादासाहेब टाके, पो. कॉं. रवी जाधव, पो. कॉं. आदित्य बेल्हेकर, म. पो. कॉं. लता पुराणे या तपास पथकाने केला आहे.

काही महिन्यांपासून दुचाकी चोरीला जात असल्याच्या अनेक तक्रारी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. त्यातच झालेल्या क्राईम मीटिंग मध्ये पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी दुचाकी चोरांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस दुचाकी चोरांचा शोध घेत होते. त्यानुसार पार्ट सुट्टे करून खोललेल्या 3, तर चांगल्या अवस्थेतील 14 अश्‍या आतापर्यंत 17 दुचाकी श्रीगोंदा पोलिसांनी जप्त केल्या असून अजून मोठ्या प्रमाणात दुचाकी सापडण्याची श्‍यक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)